NZ vs PAK T20 : न्यूझीलंडचा पाकिस्तानवर सलग दुसरा धडाकेबाज विजय

टिम सेईफर्टच्या (२२ चेंडूंत ४५ धावा) धडाकेबाज फलंदाजीला गोलंदाजांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला ५ गडी आणि ११ चेंडू राखून धूळ चारली.
NZ vs PAK T20 : न्यूझीलंडचा पाकिस्तानवर सलग दुसरा धडाकेबाज विजय
Published on

ख्राईस्टचर्च : टिम सेईफर्टच्या (२२ चेंडूंत ४५ धावा) धडाकेबाज फलंदाजीला गोलंदाजांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला ५ गडी आणि ११ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह न्यूझीलंडने ५ लढतींच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

पावसामुळे हा सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला १५ षटकांत ९ बाद १३५ धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार सलमान अघाने २८ चेंडूंत ४६ धावा फटकावल्या. मात्र जेकब डफी, बीन सीर्स, जेम्स नीशाम यांनी प्रत्येकी २ बळी घेत अन्य फलंदाजांना रोखले.

त्यानंतर न्यूझीलंडने १३.१ षटकांतच विजय मिळवला. सेईफर्ट व फिन एलन यांनी २८ चेंडूंत ६६ धावांची सलामी नोंदवली. सेईफर्टने ३ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी केली. तसेच एलनने १६ चेंडूंत ३८ धावा फटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर मिचेल हे (नाबाद २१) व कर्णधार मिचेल ब्रेसवेल (नाबाद ५) यांनी १४व्या षटकात किवी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सेईफर्ट सामनावीर ठरला.

logo
marathi.freepressjournal.in