पुढील वर्षी आयपीएल पुन्हा जुन्या रुपात खेळण्यात येणार; सौरव गांगुलींची घोषणा

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलचा फॉरमॅट बदलण्यात आला होता
पुढील वर्षी आयपीएल पुन्हा जुन्या रुपात खेळण्यात येणार; सौरव गांगुलींची घोषणा

पुढील वर्षी म्हणजेच २०२३च्या हंगामापासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पुन्हा जुन्या रुपात खेळवण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने गुरुवारी जाहीर केले. म्हणजेच संघांना स्वत:च्या मैदानासह प्रतिस्पर्धीच्या मैदानावरही सामने खेळावे लागणार आहे.

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलचा फॉरमॅट बदलण्यात आला होता. २०१९मध्ये होम-अवे या प्रकाराने सामने खेळवण्यात आले होते. त्यानंतर २०२०मध्ये संपूर्ण आयपीएल यूएईमध्ये खेळवण्यात आली. तर २०२१मध्येही भारतातील विविध शहरांत पहिला टप्पा झाल्यानंतर कोरोनाच्या शिरकावामुळे पुन्हा यूएईमध्ये आयपीएल रंगली. २०२२मध्ये मुंबईत संपूर्ण आयपीएल खेळवून बाद फेरी अहमदाबाद व कोलकाता येथे झाली. त्यामुळे आता २०२३पासून मात्र प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुन्या रुपात आयपीएलचा आनंद लुटता येणार आहे.

वर्षाच्या प्रारंभी महिलांची आयपीएल

सौरव गांगुलीने महिलांच्या आयपीएलविषयीही महत्त्वाची माहिती देताना पुढील वर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचे सांगितले. २०२३च्या महिलांच्या आयपीएलमध्ये संघसंख्येत वाढ होणार असून याव्यतिरिक्त भारतातील १५ वर्षांखालील मुलींसाठी वेगळी क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्यात येणार असल्याचे गांगुलीने जाहीर केले. २६ डिसेंबर ते १२ जानेवारीदरम्यान बंगळुरू, रांची, राजकोट, इंदूर, रायपूर, पुणे येथे हे सामने होतील, असे गांगुलीने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in