भारताची २५ वर्षीय बॉक्सर निखत झरीनने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. इस्तंबूल येथे सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत निखतने सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली.
महिलांच्या ५२ किलो वजनी गटातील अंतिम फेरीत तेलंगणच्या निखतने थायलंडच्या जितपाँग जुटामसवर ५-० असे वर्चस्व गाजवले. पाचही पंचांनी (३०-२७, २९-२८, २९-२८, ३०-२७, २९-२८) तिच्या बाजूने निकाल दिला. निखतपूर्वी मेरी कोम (२००२, २००५, २००६, २००८, २०१०, २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आर. एल. (२००६) आणि लेखा केसी (२००६) यांनी असा पराक्रम केला होता. निखतने यापूर्वी २०१९मध्ये जितपाँगवर थायलंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात केली होती.
निखत झरीनने सुवर्णपदक कमावल्यामुळे तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आजी-माजी बॉक्सिंगपटूंनीसुद्धा निखतचे कौतुक केले. काही वर्षांपूर्वी निखतने मेरी कोमच्या निवडीविरुद्ध आवाज उठवला होता. त्यावेळी तिची अनेकांनी खिल्ली उडवली. आता दोन वर्षांनी निखतने सुवर्णपदक जिंकून टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. निखतच्या सुवर्णपदकासह भारताने जागतिक स्पर्धेची दिमाखात सांगता केली. मनिषा (५७ किलो) आणि परवीन (६३ किलो) यांनी आपापल्या वजनी गटात रौप्यपदक जिंकले. त्यामुळे भारताने एकूण तीन पदके कमावली. भारताच्या एकूण १२ बॉक्सर्सपैकी आठ जणांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.