निर्मला शेरॉनवर आठ वर्षांची बंदी, उत्तेजक सेवनप्रकरणी नाडाची कारवाई

२०१८मध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होण्याआधी झालेल्या उत्तेजक चाचणीत निर्मला दोषी सापडली होती.
निर्मला शेरॉनवर आठ वर्षांची बंदी, उत्तेजक सेवनप्रकरणी नाडाची कारवाई
Published on

नवी दिल्ली : भारताची ॲॅथलीट आणि ऑलिम्पियन निर्मला शेरॉन हिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी सापडल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.

उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी सापडण्याची निर्मलाची ही दुसरी वेळ ठरली आहे. २०१८मध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होण्याआधी झालेल्या उत्तेजक चाचणीत निर्मला दोषी सापडली होती. त्याचवेळी तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेद्वारे तिने पुनरागमन केले, मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या उत्तेजक चाचणीत ती पुन्हा एकदा दोषी सापडली. त्या उत्तेजक चाचणीचा निकाल ‘नाडा’ने जाहीर केला. तिच्या शरीरात ॲनाबोलिक अँड्रोजेनिक स्टेरॉइड्स आणि टेस्टोस्टेरॉन ही प्रतिबंधित उत्तेजके सापडल्याचे चाचणीत समोर आले आहे. पहिल्या बंदीआधी निर्मला ही देशातील सर्वोत्तम ॲथलीट्समध्ये गणली जात होती. तिने भुवनेश्वर येथे झालेल्या २०१७च्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याने तिचे हे पदक काढून घेण्यात आले. निर्मलाने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता.

logo
marathi.freepressjournal.in