

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी भारताच्या नो हँडशेक पॉलिसीवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांमध्ये आधीच अस्तित्वात असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर भारताने हात मिळवण्यास नकार दिला तर, पाकिस्तानलाही कोणती इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने आशिया कप २०२५ स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तान संघासोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यानंतर, भारताने पाकिस्तानसोबत हीच भूमिका कायम ठेवली.
क्रिकेट आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अंडर-१९ संघाच्या सन्मानार्थ समारंभ आयोजित केला होता. यावेळी, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी भारताच्या नो हँडशेक पॉलिसीबद्दल म्हटले की, पीसीबी भारतावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू इच्छित नाही. पत्रकार परिषदेत बोलताना नक्वी म्हणाले की, "पहिल्या दिवसापासून आमची हीच स्पष्ट भूमिका आहे की, क्रिकेट आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे. पंतप्रधानांनी स्वतः मला दोनदा सांगितले आहे की, आपण खेळात राजकारण येऊ देऊ नये. सुरुवातीपासूनच आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत."
"जर भारताला हँडशेक करायचे नसेल, तर..."
मोहसिन नक्वी पुढे म्हणाले की, "जर भारताला हस्तांदोलन करायचे नसेल तर, आम्हालाही काही विशेष इच्छा नाही. ते आमच्याशी जसं वागतील आम्हीही त्यांच्याशी तसंच वागू आणि पुढेही हीच भूमिका कायम राहील. त्यांनी कोणतीही भूमिका घ्यायची आणि पाकिस्तानने माघार घ्यायचं हे आता शक्य नाही."
भारत-पाकिस्तान खेळाडूंमधील वाद
काही दिवसांपूर्वी झालेल्या अंडर-१९आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये मैदानावर तणाव दिसून आला. भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेला बाद केल्यानंतर पाकिस्तानी वेगवान गोलंदाज अली रझा यांच्यात वाद झाला. नंतर अली रझा याची भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीसोबतही जोरदार बाचाबाची झाली. यानंतर, पाकिस्तान अंडर १९ संघाचे प्रशिक्षक सर्फराज अहमद यांनी या घटनांवर जोरदार टीका केली. त्यांनी भारतीय संघावर गैर वर्तणूक केल्याचा आरोप केला आणि म्हटले की, त्यांनी त्यांच्या खेळाडूंना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता, परंतु भारतीय खेळाडू जास्त भावनिक झाल्याचे दिसून आले.
आशिया कपपासून नो हँडशेक पॉलिसी
एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या समर्थनात सर्वप्रथम भारतीय पुरुष संघाने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत महिला संघानेही नोहँड शेक पॉलिसी सुरुच ठेवली. तर, याच महिन्यात झालेल्या १९ वर्षांखालील पुरुषांच्या आशिया कप स्पर्धेत आणि दोहा येथे झालेल्या रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेतही नो हँडशेक पॉलिसीची भूमिका कायम ठेवण्यात आली.