

ओस्लो : नॉर्वे येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. भारताचा स्टार बुद्धिबळपटू डी. गुकेश याला क्लासिकल फेरीत मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि आर्मगेडन फेरीत त्याला वेस्ली सो याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
दुसऱ्या बाजूला, फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारताच्याच आर. प्रज्ञानंदाचा पराभव केला आणि स्पर्धेत अव्वल स्थान गाठले. जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन यालाही जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरने अत्यंत अटीतटीच्या लढतीत कडवी टक्कर दिली. कार्लसनने दोन वेळा जिंकण्याची सुवर्णसंधी गमावली, परंतु अखेर आर्मगेडन फेरीत विजय मिळवून त्याने स्पर्धेतील आपला पहिला गुण नोंदवले.
दुसऱ्या फेरीतील पराभवानंतरही गुकेश २.५ गुणांसह वेस्ली सो याच्यासोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, सलग दोन विजय मिळवून फिरोझाने ६ गुणांसह मोठी आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद आणि कार्लसन हे दोघेही सध्या प्रत्येकी १.५ गुणांसह गुणतालिकेत तळाला आहेत. गुकेश आणि वेस्ली सो यांच्यातील क्लासिकल सामना तब्बल ११६ चालींपर्यंत चालला, वेस्ली सो याने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर आर्मगेडन फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो याने गुकेशला पूर्णपणे निष्प्रभ केले. फ्रान्सचा फिरोझा पायाच्या दुखापतीमुळे कुबड्यांच्या साहाय्याने आला होता, मात्र तरीही त्याने प्रज्ञानंदचा पराभव केला.
दिव्या देशमुख दुसऱ्या स्थानी
महिलांच्या स्पर्धेत मात्र भारताच्या दिव्या देशमुख हिने आपली छाप पाडली आहे. दिव्याने आर्मगेडन फेरीत भारताचीच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी हिचा पराभव करून एक मोठा विजय नोंदवला. या विजयासह दिव्या ३ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर कझाकस्तानची बिबिसारा अस्साउबायेव्हा ४.५ गुणांसह महिलांच्या गटात अव्वल स्थानावर कायम आहे.