जोकोव्हिच-अल्कराझमध्ये आज जुगलबंदी; दोघांचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सिनेर, झ्वेरेव्ह यांचीही आगेकूच

ऑस्ट्रेलियन ओपन : सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ या दोन कडव्या प्रतिस्पर्ध्यांमधील जुगलबंदी टेनिसप्रेमींना मंगळवारी पाहायला मिळणार आहे.
जोकोव्हिच-अल्कराझमध्ये आज जुगलबंदी; दोघांचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सिनेर, झ्वेरेव्ह यांचीही आगेकूच
Published on

मेलबर्न : सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ या दोन कडव्या प्रतिस्पर्ध्यांमधील जुगलबंदी टेनिसप्रेमींना मंगळवारी पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दोघांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच इटलीचा जॅनिक सिनेर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनीही आगेकूच केली.

वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा रॉड लेव्हर एरिना येथे खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीतील चौथ्या फेरीत सातव्या मानांकित जोकोव्हिचने २४व्या मानांकित जिरी लेहेज्काला ६-३, ६-४, ७-६ (७-४) असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. तिसऱ्या मानांकित अल्कराझने १५व्या मानांकित जॅक ड्रेपरविरुद्ध ७-५, ६-१ अशी आघाडी घेतलेली असताना ड्रेपरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे आता मंगळवारी या दोघांमधील संघर्ष पाहण्यास चाहते आतुर असतील.

दुसरीकडे, गतविजेता तसेच अग्रमानांकित सिनेरने १३व्या मानांकित होल्गर रूनवर ६-३, ३-६, ६-३, ६-२ अशी चार सेटमध्ये मात केली. दुसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने १४व्या मानांकित युगो हुर्म्बटवर ६-१, २-६, ६-३, ६-२ असा विजय मिळवला. तसेच बेन शेल्टन, लॉरेंझो सोनेगो यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, जोकोव्हिच आणि अल्कराझ यांच्यातील जुगलबंदी गेल्या १-२ वर्षांत वेगळ्याच वळणाला पोहोचली आहे. रॉजर फेडरर, राफेल नदाल यांच्या निवृत्तीनंतर आता जोकोव्हिच एकटात त्या त्रिमूर्तीमधील शिल्लक आहे. मात्र गतवर्षी अल्कराझने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचला नमवले. दुसरीकडे जोकोव्हिचने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्कराझला धूळ चारली. तसेच २०२३मध्येही अल्कराझने जोकोव्हिचला कडवी झुंज दिली. २०२४मध्ये जोकोव्हिचला एकही ग्रँडस्लॅम जिंकता आले नाही. त्यामुळे आता अल्कराझ जोकोव्हिचला पुन्हा जेतेपदापासून रोखणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

सबालेंका, गॉफ, स्विआटेकची घोडदौड

महिला एकेरीत गतविजेती आर्यना सबालेंका आणि पोलंडची दुसरी मानांकित इगा स्विआटेक यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अग्रमानांकित सबालेंकाने मिरा आंद्रेव्हाला ६-१, ६-२ अशी सहज धूळ चारली. स्विआटेकने लीझचा ६-०, ६-१ असा फडशा पाडला. अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित कोको गॉफने बेलिंडा बेनकिकला ५-७, ६-२, ६-१ असे पिछाडीवरून नमवले. त्याशिवाय आठवी मानांकित एमा नवारो, १९वी मानांकित मॅडिसन कीझ, २८वी मानांकित एलिना स्विटोलिना, ११वी मानांकित पावला बडोसा यांनीही आगेकूच केली. आता मंगळवारपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगतील. नाओमी ओसाकाचा पराभव आणि बार्टीच्या निवृत्तीनंतर सबालेंका आणि स्विआटेक यांनाच नव्या पिढीच्या नायिका म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे अंतिम फेरीत या दोघींमधील द्वंद्व पाहायला मिळू शकते.

logo
marathi.freepressjournal.in