नोव्हाक जोकोव्हिचची आगेकूच; यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

दुसरीकडे भारताची किशोरवयीन टेनिस खेळाडू माया राजेश्वरन रेवतीने देखील चीनच्या झँग क्वीआरन वुईला पराभूत करत यूएस ओपन ज्युनियर मुलींच्या एकेरी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

न्यूयॉर्क : स्टार खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने जान-लेनार्ड स्ट्रफला ६-३, ६-३, ६-२ असे पराभूत करत यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान जोकोव्हिचच्या मानेला दुखापत झाली. मात्र तरीही त्यावर मात करत जोकोव्हिचने सामन्यात सरशी साधली.

स्पर्धेत आतापर्यंत ही माझी सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यात सातत्य राहणे अपेक्षित असल्याचे जोकोव्हिच सामन्यानंतर म्हणाला. सामन्यात एका क्षणाला आघाडीवर असताना जोकोव्हिचच्या मानेला त्रास झाला. मात्र त्याने खेळ थांबवला नाही.

या विजयासह जोकोव्हिचने स्ट्रफविरुद्ध आपली अपराजित मालिका ८-० अशी कायम ठेवली. आता त्याला पुढच्या सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचे आव्हान असेल.

चौथा मानांकीत फ्रिट्झ हा स्पर्धेत खेळत असलेला अमेरिकेचा शेवटचा पुरुष खेळाडू आहे. त्याने २१व्या मानांकीत चेक प्रजासत्ताकच्या टोमास माचाकला ६-४, ६-३, ६-३ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

माया राजेश्वरनची विजयी सलामी

न्यूयॉर्क : भारताची किशोरवयीन टेनिस खेळाडू माया राजेश्वरन रेवतीने चीनच्या झँग क्वीआरन वुईला पराभूत करत यूएस ओपन ज्युनियर मुलींच्या एकेरी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

कोइंबतूरच्या बिगर मानांकीत १६ वर्षीय मायाने चीनच्या खेळाडूला ७-६ (७-५), ६-३ असे पराभूत केले. हा सामना एक तास ३० मिनिटे चालला.

दुसऱ्या फेरीत मायासमोर दुसऱ्या मानांकीत युकेच्या हन्नाह क्लुगमनचे आव्हान आहे. क्लुगमनने अमेरिकेच्या अस्पेन शुमनला पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

रेवतीने अलिकडेच मुंबई ओपन डब्ल्यूटीए१२५ स्पर्धेत मानांकित खेळाडूंना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती.

logo
marathi.freepressjournal.in