ऑस्ट्रेलियन ओपन : जायबंदी जोकोव्हिचची माघार; झ्वेरेव्ह, सिनेर अंतिम फेरीत

२५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी आतुर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पहिल्या सेटनंतरच दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.
ऑस्ट्रेलियन ओपन : जायबंदी जोकोव्हिचची माघार; झ्वेरेव्ह, सिनेर अंतिम फेरीत
Published on

मेलबर्न : २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी आतुर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पहिल्या सेटनंतरच दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने अंतिम फेरी गाठली. आता रविवारी त्याची जेतेपदासाठी इटलीच्या गतविजेत्या जॅनिस सिनेरशी गाठ पडेल.

वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या पुरुष एकेरीच्या प्रथम उपांत्य लढतीत दुसरा मानांकित झ्वेरेव्ह सातव्या मानांकित जोकोव्हिचविरुद्ध ७-६ (७-५) असा आघाडीवर होता. मात्र या सेटच्या अखेरीस जोकोव्हिचच्या डाव्या पायाला फार वेदना झाल्या. काही काळ तो गुडघा धरून होता. अखेरीस त्याने स्वत:हूनच पुढाकार घेत झ्वेरेव्हशी हात मिळवणी केली. २०२४मध्ये एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकू न शकलेल्या ३७ वर्षीय जोकोव्हिचने उपांत्यपूर्व लढतीत कार्लोस अल्कराझला नमवले होते. त्यामुळे यावेळी जोकोव्हिचला जेतेपदाची उत्तम संधी होती. मात्र दुखापत त्याच्या मार्गात अडथळा ठरली. २७ वर्षीय झ्वेरेव्हने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली. यापूर्वी २०२४मध्ये फ्रेंच ओपन, तर २०२०मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत झ्वेरेव्हला पराभव पत्करावा लागला आहे. यंदा तो पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसऱ्या उपांत्य लढतीत अग्रमानांकित सिनेरने अमेरिकेच्या २१व्या मानांकित बेन शेल्टनला ७-६ (७-२), ६-२, ६-२ असे सरळ तीन सेटमध्ये नेस्तनाबूत केले. २३ वर्षीय सिनेर हा सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठणारा पहिलाच इटालियन खेळाडू ठरला. दोन ग्रँडस्लम जेतेपदे नावावर असलेला सिनेर कारकीर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम पटकावण्यास आतुर आहे.

महिलांमध्ये आज सबालेंका विरुद्ध कीझ

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत शनिवारी बेलारूसची गतविजेती तसेच अग्रमानांकित आर्यना सबालेंका आणि अमेरिकीची १९वी मानांकित मॅडीसन कीझ यांच्यात द्वंद्व रंगेल. सबालेंकाने गेली दोन वर्षे ही स्पर्धा जिंकली असून सलग तिसऱ्या जेतेपदाची तिला संधी आहे. तर कीझने प्रथमच अंतिम फेरी गाठली असून तिला कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद खुणावत आहे.

logo
marathi.freepressjournal.in