आता आघाडीसाठी आटापिटा! भारताचा आज दक्षिण आफ्रिकेशी तिसरा टी-२० सामना; रमणदीपला संधी मिळणार?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ सामन्यांची टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे. त्यामुळे बुधवारी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. विशेषत: कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून भारतीय चाहत्यांना या लढतीत मोठी खेळी अपेक्षित असून आघाडीच्या फळीला कामगिरीत सुधारणेला वाव आहे.
रमणदीप सिंग
रमणदीप सिंग
Published on

सेंच्युरियन : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ सामन्यांची टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे. त्यामुळे बुधवारी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. विशेषत: कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून भारतीय चाहत्यांना या लढतीत मोठी खेळी अपेक्षित असून आघाडीच्या फळीला कामगिरीत सुधारणेला वाव आहे.

२४ व २५ नोव्हेंबर रोजी आयपीएलची लिलाव प्रकिया होणार असून त्यापूर्वी उर्वरित दोन सामन्यांत छाप पाडून संघमालकांचे लक्ष वेधण्याची खेळाडूंना संधी आहे. उभय संघांतील पहिल्या लढतीत भारताने सहज वर्चस्व गाजवले. संजू सॅमसनच्या शतकानंतर भारताच्या गोलंदाजांनी चमक दाखवी. मात्र रविवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत भारताला निसटता पराभव पत्करावा लागला. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने पाच बळी मिळवले. मात्र फलंदाजीतील अपयश भारताला महागात पडले. त्यामुळे आता पुन्हा फलंदाज कामगिरी उंचावतील, अशी अपेक्षा आहे.

सूर्यकुमारला गेल्या दोन लढतींमध्ये अनुक्रमे २१ व ४ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याची बॅट तळपल्यास पुढील गणित सोपे होईल. टी-२० प्रकारात ४ शतके नावावर असलेल्या ३४ वर्षीय सूर्यकुमारने गेल्या ७ टी-२० सामन्यात एकच अर्धशतक झळकावले आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार भारतीय संघात नसला, तरी लवकरच सय्यद मुश्ताक अली ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा होणार असून त्यापूर्वी लय मिळवण्याचे सूर्यकुमारचे लक्ष्य असेल. पहिल्या सामन्यात सॅमसनचे शतक सोडल्यास भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला होता. तर दुसऱ्या लढतीत भारताचे फलंदाज आफ्रिकेपुढे पूर्णपणे ढेपाळले.

दुसरीकडे एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेलासुद्धा फलंदाजांचे अपयश सतावत आहे. स्वत: मार्करमसह हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ट्रिस्टन स्टब्सने मात्र अल्पावधीत छाप पाडली आहे. वेगवान गोलंदाजी ही आफ्रिकेची ताकद असून जेराल्ड कोएट्झे, मार्को यान्सेन व अँडीले सिमलेन हे त्रिकुट धोकादायी ठरू शकेत. फिरकीपटू केशव महाराज व नकाबायोम्झी पीटर यांची जोडी उत्तम कामगिरी करत आहे. या लढतीत पावसाची मूळीच शक्यता नसून खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असणार आहे.

फिरकीपटू लयीत; रमणदीपला संधीची प्रतीक्षा

जादूई फिरकीपटू वरुण (२ सामन्यांत ८ बळी) व लेगस्पिनर रवी बिश्नोई (२ सामन्यांत ४ बळी) यांची फिरकी जोडी भारतासाठी सातत्याने योगदान देत आहे. तसेच डावखुरा अक्षर पटेलही धावा रोखत आहे. मात्र वेगवान गोलंदाजांचे अपयश भारतासाठी डोकेदुखी आहे. आवेश खान व हार्दिक यांना अर्शदीप सिंगला साथ देता आलेली नाही. तसेच फलंदाजीचा क्रम लांबवण्यासाठी २७ वर्षीय अष्टपैलू रमणदीप सिंगला आवेशच्या जागी संधी दिली जाऊ शकते. रमणदीप हा खालच्या क्रमांकावर येत फटकेबाजी करण्यात पटाईत असून तो मध्यमगती गोलंदाजीही करतो.

सॅमसनवर भिस्त; अभिषेक, रिंंकूवर नजरा

सलामीला संधी दिल्यापासून छाप पाडणारा सॅमसन गेल्या सामन्यात लवकर बाद झाला व परिणामी भारताची फलंदाजी ढेपाळली. मात्र तरीही सॅमसन व सूर्यकुमार यांच्यावरच प्रामुख्याने फलंदाजीची भिस्त आहे. त्यातच डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा (२ सामन्यांत ११ धावा) व रिंकू सिंग (२ सामन्यांत २० धावा) यांचा धावांसाठी संघर्ष सुरू असल्याने भारताची चिंता वाढली आहे. यशस्वी जैस्वाल संघात परतल्यावर सॅमसन किंवा अभिषेकपैकी एकाला संघाबाहेर करण्यात येईल, हे निश्चित. तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांना सातत्य राखणे गरजेचे आहे. भारताची फलंदाजी सातव्या क्रमांकापर्यंतच असल्याने आठव्या स्थानी एखाद्या अष्टपैलू खेळाडूला संधी देता येऊ शकते.

१४ सेंच्युरियनला झालेल्या आतापर्यंतच्या १४ टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ ७, तर धावांचा पाठलाग करणारा संघही ७ सामने जिंकला आहे. भारताने २०१८मध्ये येथे एकमेव लढत खेळली, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला.

१६-१२ उभय संघांत झालेल्या २९ टी-२० सामन्यांपैकी भारताने १६, तर दक्षिण आफ्रिकेने १२ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आकेडवारीनुसार भारताचे पारडे जड असल्याचे दिसते.

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमन, जेराल्ड कोएट्झे, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंग्वाना, नकाबायोम्झी पीटर, रायन रिकेलटन, अँडीले सिमलेन, ट्रिस्टन स्टब्स.

logo
marathi.freepressjournal.in