भारताच्या नुपूरचे पदक निश्चित! जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ८० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश

भारताची अनुभवी बॉक्सर नुपूर शेरॉनने बुधवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले. यंदाच्या जागतिक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.
भारताच्या नुपूरचे पदक निश्चित! जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ८० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश
Photo : X (@airnewsalerts)
Published on

लिव्हरपूल : भारताची अनुभवी बॉक्सर नुपूर शेरॉनने बुधवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले. यंदाच्या जागतिक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.

लिव्हरपूल, इंग्लंड येथे जागतिक बॉक्सिंग स्पर्धा सुरू असून यामध्ये भारताचे महिला व पुरुष बॉक्सर मिळून २० खेळाडू सहभागी झाले आहेत. यंदा नव्या प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगची जागतिक स्पर्धा होणार आहे. यापूर्वी आयबीए म्हणजेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धांचे आयोजन केले जायचे. ४ ते १४ सप्टेंबर या काळात रंगणाऱ्या या स्पर्धेत ६५ देशांतील ५५० बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. यामध्ये १७ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेते आहेत. त्यामुळे भारताला कडवे आव्हान मिळेल.

दरम्यान, महिलांच्या ८० किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत २६ वर्षीय नुपूरने उझबेकिस्तानच्या ओल्टोनी सोटीमबेव्हाला ४-१ असे पराभूत केले. त्यामुळे तिचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. बॉक्सिंगच्या जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली, तरी पदक सुनिश्चित होते. कांस्यपदकासाठी वेगळी लढत खेळवली जात नाही. महान बॉक्सर हवा सिंग यांची नात असलेल्या नुपूरने प्रथमच जागतिक स्पर्धेत अशी कामगिरी नोंदवली. ऑलिम्पिकमध्ये ८० किलोच्या वजनी गटाचा समावेश नाही. मात्र तरीही नुपूरने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. आता राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतही तिच्या कामगिरीवर लक्ष असेल.

नुपूरव्यतिरिक्त भारताच्या अन्य बॉक्सर्सलासुद्धा येत्या दिवसात जागतिक पदक जिंकण्याची संधी आहे. दुहेरी जागतिक पदकविजेती निखत झरीन (५१ किलो), जास्मिन लंबोरिया (५७), पूजा राणी (८०) यांनीसुद्धा आपापल्या गटात सोमवारीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे त्या सर्व पदकापासून एक पाऊल दूर आहेत.

२९ वर्षीय निखत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच गारद झाली होती. आता मात्र तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. २०२२ व २०२३च्या जागतिक स्पर्धेत निखतने सुवर्ण काबिज केले होते. निखतने आतापर्यंत स्पर्धेत सुवर्णपदकाच्या प्रबळ दावेदाराप्रमाणेच खेळ केला आहे. तसेच दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती लवलिना बोर्गोहैन यावेळी सलामीलाच गारद झाल्याने निखतवर आशा टिकून आहेत.

logo
marathi.freepressjournal.in