भारत-बांगलादेश टी-२० मालिका : शोबना, सजना यांचा भारतीय महिला संघात समावेश

भारत-बांगलादेश यांच्यात २८ जुलैपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगणार असून भारतीय संघ या दौऱ्यासाठी पुढील आठवड्यात बांगलादेशला रवाना होईल. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जला मात्र या संघात स्थान लाभलेले नाही.
भारत-बांगलादेश टी-२० मालिका : शोबना, सजना यांचा भारतीय महिला संघात समावेश
Published on

नवी दिल्ली : फिरकीपटू आशा शोबना आणि अखेरच्या षटकांत फटकेबाजी करणारी सजना सजीवन यांचा आगामी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघात समावेश करण्यात आला आहे. भारत-बांगलादेश यांच्यात २८ जुलैपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगणार असून भारतीय संघ या दौऱ्यासाठी पुढील आठवड्यात बांगलादेशला रवाना होईल. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जला मात्र या संघात स्थान लाभलेले नाही.

३३ वर्षीय लेगस्पिनर शोबनाने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तिने १० सामन्यांत १२ बळी मिळवले. दुसरीकडे २९ वर्षीय सजना ही आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळते. तिने पहिल्याच सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून लक्ष वेधले. सजना ही ऑफस्पिनरसुद्धा आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने ही मालिका निर्णायक ठरणार असून हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्येच टी-२० विश्वचषक रंगणार आहे.

श्रेयांका पाटील, साइका इशाक यांनाही संघात स्थान लाभले आहे. वेगवान गोलंदाजीची मदार रेणुका ठाकूर व पूजा वस्त्रकार यांच्यावर असेल. फलंदाजीत हरमनप्रीत, शफाली वर्मा, रिचा घोष, स्मृती मानधना असे खेळाडू भारताच्या ताफ्यात आहेत. मात्र मुंबईकर जेमिमाला वगळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, सजना सजीवन, रिचा घोष, यास्तिका भाटिया, राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, साइका इशाक, आशा शोबना, रणुका ठाकूर, तिथास साधू.

logo
marathi.freepressjournal.in