
गेल्या काही दिवसांपासून भारतातील ऑलिम्पिकवीर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर या खेळाडूंनी आपल्या आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात केली असून ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अशामध्ये आज ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट करत, 'कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळावा' अशी मागणी केली आहे. दरम्यान, ऑलिम्पिक विजेती विनेश फोगटने भावुक होऊन भारतीय क्रिकेटपटू आणि इतर बड्या खेळाडूंच्या शांत बसण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा ट्विटमध्ये म्हणाला आहे की, "ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळावा. आपले खेळाडू रस्त्यावर उतरून न्याय मागत आहेत, हे पाहून मला वेदना झाल्या आहेत. त्यांनी आपल्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आपल्याला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. सध्या जे घडते आहे, ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा असून तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा." अशी मागणी त्याने यावेळी केली आहे.