विनेशसाठी 'तारीख पे तारीख', ऑलिम्पिकमधील पदकाबाबतचा फैसला आता शुक्रवारी रात्री

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटातून अपात्र ठरवण्यात आल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. मात्र या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना क्रीडा लवादाकडून मात्र ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू आहे.
विनेशसाठी 'तारीख पे तारीख', ऑलिम्पिकमधील पदकाबाबतचा फैसला आता शुक्रवारी रात्री
संग्रहित छायाचित्र
Published on

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटातून अपात्र ठरवण्यात आल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. मात्र या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना क्रीडा लवादाकडून मात्र ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू आहे. क्रीडा लवादाने याप्रकरणी आणखी वेळ मागितला असून आता निकाल १६ ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सुनावला जाणार आहे.

विनेश फोगट हिने महिलांच्या ५० किलो वजनी गटात मंगळवारी तीन लढती जिंकून अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे तिचे किमान रौप्यपदक निश्चित झाले होते. मात्र अंतिम फेरीआधी बुधवारी सकाळी वजन तपासणीसाठी गेली असता, तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला संपूर्ण स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. त्याच दिवशी तिने क्रीडा लवादाकडे अपील केले आहे. क्रीडा लवादाने २४ तासांच्या आत निर्णय देणे अपेक्षित असताना, निकाल जाहीर करण्यास तीन वेळा मुदत मागितली आहे. विनेशबाबतचा निर्णय मंगळवारी जाहीर होण्याची अपेक्षा असताना, क्रीडा लवादाने पुन्हा एकदा निराशा केली.

क्रीडा लवादाकडे विनेश फोगटची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांची निवड भारताने केली होती. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी सिंघानिया म्हणाले की, “आम्ही याचिका दाखल केल्यानंतर विनेशची बाजू मांडण्यासाठी खूप मेहनत घेतली. विनेशला रौप्यपदक मिळेल, अशी आशा आम्हाला आहे. विनेशच्या प्रकरणावर निकाल देण्यासाठी क्रीडा लवादापुढे २४ तासांचा अवधी होता. पण क्रीडा लवादाने २४ तासांत निर्णय दिला नाही. त्यानंतर त्यांनी निर्णय देण्याचा अवधी वाढवला आहे. या गोष्टीचा असा अर्थ निघतो की, क्रीडा लवादाने ही गोष्ट गंभीरपणे घेतली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रीडा लवाद एवढ्या वेळा विचार करत आहे, म्हणजेच निर्णय आपल्या बाजूने असेल, अशी मला आशा आहे.”

logo
marathi.freepressjournal.in