ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिनाच्या प्रशिक्षकांना अखेर बॉक्सिंग व्हिलेजमध्ये प्रवेश

रविवारी त्यांना बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या व्हिलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला
ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिनाच्या प्रशिक्षकांना अखेर बॉक्सिंग व्हिलेजमध्ये प्रवेश

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिना प्रशिक्षक संध्या गुरूंग यांना अखेर राष्ट्रकुल स्पर्धेच्या ठिकाणी बॉक्सिंग व्हिलेजमध्ये प्रवेश मिळाला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिनाने सोशल मीडिया पोस्ट करत आपला मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारतीय क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दखल घेत लोव्हलिनाच्या प्रशिक्षक गुरूंग यांना स्पर्धेच्या ठिकाणी पाठविण्याची त्वरित व्यवस्था करावी, अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला (आयओए) केली होती.

गुरूंग या भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक आहेत. त्यांना स्पर्धेच्या आदल्या दिवशी राष्ट्रकुलसाठी जाणाऱ्या चमूत समावेश करण्यात आला. रविवारी त्यांना बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या व्हिलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्याकडे अॅक्रेडिटेशन नसल्याने हा प्रवेश नाकारण्यात आला होता. यानंतर लोव्हलिनाने मानसिक छळाची पोस्ट केल्याने खळबळ माजली होती.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने माहिती दिली की, संध्या आता बॉक्सिंग व्हिलेजमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना अॅक्रेडिटेशन देण्यात आले आहे. आता त्या संघासोबत आहेत. त्यांना गेम व्हिलेजमध्ये एक रूमदेखील देण्यात आली आहे.

दरम्यान, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की, नियमानुसार खेळाडूंच्या ३३ टक्के सपोर्ट स्टाफ नेण्यास परवानगी असते. भारतीय बॉक्सिंग चमूत १२ खेळाडू आहेत. त्यात आठ पुरुष आणि चार महिला खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यासोबत चार सपोर्ट स्टाफ सदस्य पाठविता येतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in