ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धा (महिला); न्यूझीलंडला नमवल्याने महिलांचे आव्हान शाबूत

एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३-१ अशी धूळ चारली.
ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धा (महिला); न्यूझीलंडला नमवल्याने महिलांचे आव्हान शाबूत
Published on

रांची : भारतीय महिला हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे स्थान पक्के करण्याच्या आशा अद्याप टिकवून ठेवल्या आहेत. रविवारी एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३-१ अशी धूळ चारली.

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर झालेल्या ब-गटातील या सामन्यात भारतासाठी संगीता कुमारी, उदिता दुहान आणि ब्युटी डुंगडुंग यांनी अनुक्रमे पहिल्या, १२व्या आणि १४व्या मिनिटाला गोल नोंदवले. पहिल्या सत्रातच घेतलेली ही आघाडी भारताच्या विजयासाठी पुरेशी ठरली. न्यूझीलंडसाठी नवव्या मिनिटाला ह्यूल मेगानने एकमेव गोल केला. दोन सामन्यांतील एका विजयाच्या ३ गुणांसह भारतीय संघ गटात तिसऱ्या स्थानी आहे. भारताची आता अखेरच्या लढतीत १६ जानेवारीला इटलीशी गाठ पडणार आहे. गटातून दोनच संघ आगेकूच करणार असल्याने भारताला ही लढत जिंकणे अनिवार्य असेल.

पहिल्या लढतीत भारताला अमेरिकेकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडने मात्र इटलीला ३-० असे सहज नमवले होते. त्यामळे ते सध्या सरस गोल फरकाच्या बळावर दुसऱ्या स्थानी टिकून आहेत. अमेरिका दोन विजयांच्या ६ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुले ते ११ ऑगस्टच्या काळात खेळवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in