ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धा (महिला): भारतीय महिला उपांत्य फेरीत; निर्णायक साखळी सामन्यात इटलीचा ५-१ असा धुव्वा

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून उदिता दुहानने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना दोन गोल नोंदवले.
ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धा (महिला): भारतीय महिला उपांत्य फेरीत; निर्णायक साखळी सामन्यात इटलीचा ५-१ असा धुव्वा

रांची : भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे तिकीट मिळवण्याच्या आशा अद्याप कायम आहेत. ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारताने इटलीचा ५-१ असा धुव्वा उडवला. आता भारताची १८ जानेवारीला पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य जर्मनीशी गाठ पडेल.

रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून उदिता दुहानने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना दोन गोल नोंदवले. तिने अनुक्रमे पहिल्या व ५५व्या मिनिटाला गोल केले. दीपिका कुमारी (४१वे मिनिट), सलिमा टेटे (४५वे मि.), नवनीत कौर (५३वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. इटलीच्या कॅमिला मचिनने ६०व्या मिनिटाला संघासाठी एकमेव गोल केला.

भारताने ब-गटात तीन सामन्यांतील दोन विजयांच्या ६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. अमेरिका सर्वाधिक ९ गुणांसह गटात अग्रस्थानी राहिली. त्यामुळे न्यूझीलंड व इटलीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. अ-गटातून जर्मनी व जपान यांनी आगेकूच केली. चिली, चेक प्रजासत्ताक संघ गारद झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in