IND vs ENG : पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले ; भारत स्पर्धेतून बाहेर

इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केल्याने भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला. 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना रंगणार
IND vs ENG : पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले ; भारत स्पर्धेतून बाहेर

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक (World Cup T20) स्पर्धेमध्ये गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाने उभारलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताचा तब्बल 10 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. जोस बटलरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी स्वताची अर्धशतकी खेळी करत संघासाठी शतकी भागीदारी केली व इंग्लंडला विजयापर्यंत नेलं.बटलरने पहिल्याच षटकात तीन चौकार मारून आपला इरादा जाहीर केला. त्यानंतर अॅलेक्स हेल्सने दुसऱ्या टोकाकडून आक्रमण केले. बटलरने नाबाद 80 आणि हेल्सने 86 धावा करत इंग्लंडला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. राहुल अवघ्या पाच धावा करून माघारी परतला. कर्णधार रोहित २७ धावांवर तर सूर्यकुमार यादव १४ धावांवर बाद झाला. एका बाजूने शानदार खेळ करणाऱ्या विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण करताच तो तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने भारतीय डावाची धुरा सांभाळली. सुरुवातीला अंदाज बांधल्यानंतर अखेरच्या चार षटकांत त्याने इंग्लिश गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 63 धावा केल्या. इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केल्याने भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला. 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in