पॅरिस ऑलिम्पिकसाठी उरले अवघे १०० दिवस! खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित; चाहत्यांमध्ये स्पर्धेची उत्कंठा वाढली

खराब हवामानामुळे सूर्यप्रकाशाशिवायच दक्षिण ग्रीसमधील प्राचीन ऑलिम्पिक खेळांच्या केंद्रावर यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची ज्योत पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करण्यात आली.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी उरले अवघे १०० दिवस! खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित; चाहत्यांमध्ये स्पर्धेची उत्कंठा वाढली
Published on

पॅरिस : प्रतिष्ठेच्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आता ‌अवघ्या १०० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. बुधवारी आयफेल टॉवरसमोर मोठ्या घड्याळ्यात ऑलिम्पिकच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली. प्रत्येक क्रीडापटूच्या आयुष्यात मोलाचे स्थान असलेल्या या स्पर्धेची आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याशिवाय बुधवारी ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्याचा कार्यक्रमही पार पडला. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार आहे.

खराब हवामानामुळे सूर्यप्रकाशाशिवायच दक्षिण ग्रीसमधील प्राचीन ऑलिम्पिक खेळांच्या केंद्रावर यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची ज्योत पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करण्यात आली. परंपरेनुसार, सूर्याची किरणे एका आरशात साठवून घेतली जातात आणि त्या किरणांच्या मदतीने ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यात येते. मात्र, यंदा हवामान खराब असल्यामुळे आदल्या दिवशीच एक ज्योत प्रज्वलित करून ठेवण्यात आली होती. परंपरेनुसार, प्राचीन ग्रीक पुजाऱ्याचा वेश परिधान केलेल्या अभिनेत्री मेरी मिनाने ही ज्योत स्वीकारली. ग्रीक सूर्यदेवतेची प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर यापूर्वीच प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीवर ती पेटविण्यात आली. खराब हवामानामुळे या वेळी सूर्यकिरणांऐवजी आधीच एका प्राचीन ग्रीक भांडयात आग तयार करण्यात आली होती. ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम झाल्यावर काही मिनिटांतच स्वच्छ सूर्यप्रकाश पडला.

या प्राचीन ऑलिम्पियातील मैदानापासून ही ज्योत निघेल. ग्रीसचा ११ दिवसांचा ५ हजार किलोमीटरचा प्रवास करून २६ एप्रिल रोजी अथेन्स येथे ती पॅरिस ऑलिम्पिकच्या संयोजन समिती अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी या वेळी ऑलिम्पिकच्या शांतता आणि एकात्मतेच्या भावनेची ओळख करून देताना जगात शांतता नांदावी यासाठी ही स्पर्धा प्रेरक ठरेल अशी आशा व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in