भारतीय महिला क्रिकेट सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनाची दमदार खेळी

कारकीर्दीतील २४वे अर्धशतक झळकावणाऱ्या स्मृतीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 भारतीय महिला क्रिकेट सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनाची दमदार खेळी

डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाने (९९ चेंडूंत ९१ धावा) साकारलेल्या दमदार खेळीला कर्णधार हरमनप्रीत कौर (९४ चेंडूंत ७४) आणि यास्तिका भाटिया (४७ चेंडूंत ५०) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभल्यामुळे भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडवर सात गडी आणि ३४ चेंडू राखून वर्चस्व गाजवले.

होव येथील कौंटी मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने दिलेले २२८ धावांचे लक्ष्य भारताने ४४.२ षट्कांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. या विजयासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील दुसरा सामना बुधवारी खेळवण्यात येईल. कारकीर्दीतील २४वे अर्धशतक झळकावणाऱ्या स्मृतीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शफाली वर्माला (१) स्वस्तात गमावले. त्यानंतर स्मृती आणि यास्तिका यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९६ धावांची भर घातली. यास्तिका कारकीर्दीतील चौथे अर्धशतक नोंदवून माघारी परतली. त्यानंतर स्मृती आणि हरमनप्रीत यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी रचून भारताचा विजय सुनिश्चित केला. स्मृतीला सहावे शतक साकारणार असे वाटत असतानाच १० चौकार आणि एका षट्कारासह ९१ धावांवर ती बाद झाली. परंतु हरमनप्रीतने मात्र त्यानंतर अधिक पडझड होऊ न देता हरलीन देओलच्या (नाबाद ६) साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हरमनप्रीतने सात चौकार व एका षटकारासह ७४ धावा फटकावल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची एकवेळ ५ बाद ९४ अशी अवस्था होती; मात्र डॅनी व्हॅट (४३) आणि एलिस रिचर्ड्स (नाबाद ५०) यांच्या योगदानामुळे इंग्लंडने ५० षट्कांत ७ बाद २२७ धावांपर्यंत मजल मारली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in