इंग्लंडची शेपटी झटपट गुंडाळणार, की 'हा' क्षण गेमचेंजर ठरणार? ओव्हल कसोटी रंगतदार वळणावर; भारतीय गोलंदाजांसमोर मोठं आव्हान

IND vs ENG : जो रूट (१५२ चेंडूंत १०५ धावा) आणि हॅरी ब्रूक (९८ चेंडूंत १११ धावा) या इंग्लंडच्या दोन अनुभवी फलंदाजांनी रविवारी दमदार शतकांचा नजराणा सादर केला. मात्र अखेरच्या सत्रात भारतीय वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. ब्रूक, रूटसह जेकब बेथलला (५) बाद करून त्यांनी सामन्यात चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे आता...
इंग्लंडची शेपटी झटपट गुंडाळणार, की 'हा' क्षण गेमचेंजर ठरणार? ओव्हल कसोटी रंगतदार वळणावर; भारतीय गोलंदाजांसमोर मोठं आव्हान
Published on

लंडन : जो रूट (१५२ चेंडूंत १०५ धावा) आणि हॅरी ब्रूक (९८ चेंडूंत १११ धावा) या इंग्लंडच्या दोन अनुभवी फलंदाजांनी रविवारी दमदार शतकांचा नजराणा सादर केला. मात्र अखेरच्या सत्रात भारतीय वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. ब्रूक, रूटसह जेकब बेथलला (५) बाद करून त्यांनी सामन्यात चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे आता भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा निकाल आता सोमवारी म्हणजेच पाचव्या दिवशी लागणार आहे.

फक्त ३५ धावांची गरज, शेपूट गुंडाळण्याचं आव्हान

भारताने दिलेल्या ३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ७६.२ षटकांत ६ बाद ३३९ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अवघ्या ३५ धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी चार बळींची आवश्यकता आहे. अंधूक सूर्यप्रकाश व पावसामुळे रविवारी खेळ जवळपास १ तास लवकरच थांबवण्यात आला. त्यामुळे आता सोमवारी भारतीय संघ उर्वरित ३५ धावांत ४ बळी मिळवून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधणार की इंग्लंडचा संघ उरलेल्या धावा काढून मालिकेत ३-१ असे वर्चस्व राखणार, हे पाहणे रंजक ठरेल. चौथ्या दिवसअखेर जेमी स्मिथ २, तर जेमी ओव्हर्टन शून्यावर खेळत आहे.

आयसीसीने २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. परिणामी रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन असे तारांकित खेळाडूही एकामागोमाग कसोटीतून निवृत्त झाले. त्यामुळे आता युवा शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

मात्र गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत मग भारताने दुसऱ्या डावात तब्बल पाच सत्र फलंदाजी करून लढत अनिर्णित राखली. त्यामुळे उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ असा आघाडीवर आहे. मुख्य म्हणजे भारताने आजवर कोणत्याही मालिकेत २-१ अशा पिछाडीवर असताना मालिका बरोबरीत सोडवलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ यावेळी हा पराक्रम करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. भारताने २००७मध्ये यापूर्वी इंग्लंडमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात अखेरची कसोटी मालिका जिंकली होती.

दरम्यान, भारताने दिलेल्या ३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ५० धावा केल्या होत्या. तेथून पुढे रविवारी चौथ्या दिवसाला प्रारंभ करताना बेन डकेट व कर्णधार ओली पोप यांनी सावध सुरुवात केली. डकेटने ६ चौकारांसह अर्धशतक साकारले. प्रसिध कृष्णाने त्याचा अडसर दूर केला, तर मोहम्मद सिराजने पोपला (२७) पायचीत पकडले. ३ बाद १०६ धावांवरून मग रूट व ब्रूक यांची जोडी जमली. या दोघांनी उपहारापर्यंत इंग्लंडला १६४ धावांपर्यंत पोहोचवले. ब्रूकला १९ धावांवर असताना जीवदान लाभले. तर रूटच्या विरोधात एक पायचीतचे अपील पंचांनी फेटाळले.

दुसऱ्या सत्रातही रूट व ब्रूक यांनी आक्रमण कायम राखले. विशेषत: ब्रूकने १४ चौकार व २ षटकारांसह मालिकेतील दुसरे, तर कसोटी कारकीर्दीतील १०वे शतक साकारले. दुसरीकडे रूटने १२ चौकारांसह कसोटीतील ३९वे शतक पूर्ण केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. अखेरीस आकाश दीपने ६३व्या षटकात ब्रूकला बाद करून ही जोडी फोडली.

चहापानानंतर तिसऱ्या सत्रात इंग्लंडला विजयासाठी ५७ धावांची गरज होती. मात्र कृष्णाने प्रथमच बेथलला, तर नंतर रूटला माघारी पाठवून सामन्यात रंगत निर्माण केली. इंग्लंडची अचानक ६ बाद ३३७ अशी अवस्था झाली. ख्रिस वोक्स दुखापतीमुळे फलंदाजीस येईल की नाही, याविषयी साशंका आहे. तसेच ८० षटकांनंतर भारताकडे दुसरा नवा चेंडू घेण्याचीही संधी आहे. त्यामुळे आता स्मिथसह तळाच्या फलंदाजांना सोमवारी सकाळी लवकर बाद करण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान असेल. भारतासाठी कृष्णाने ३, सिराजने २, तर आकाशने १ बळी मिळवला आहे.

हा क्षण ठरणार गेमचेंजर?

ब्रूक १९ धावांवर फलंदाजी करत असताना कृष्णाच्या गोलंदाजीवर त्याने पूलचा फटका लगावला. यावेळी सीमारेषेजवळ असलेल्या सिराजने त्याचा उत्तम झेल टिपला. मात्र त्याचवेळी सिराजचा उजवा पाय सीमारेषेला लागला. पंचांनी षटकार घोषित केला. त्यामुळे हा क्षण भारतासाठी खलनायक ठरू शकतो. ब्रूकने या जीवदानाचा लाभ उचलून १११ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक

-भारत (पहिला डाव) : २२४

-इंग्लंड (पहिला डाव) : २४७

-भारत (दुसरा डाव) : ३९६

-इंग्लंड (दुसरा डाव) : ७६.२ षटकांत ६ बाद ३३९ (हॅरी ब्रूक १११, जो रूट १०५, बेन डकेट ५४; प्रसिध कृष्णा ३/१०९)

logo
marathi.freepressjournal.in