गिलचे अतिकौतुक महागात पडेल; श्रीकांत यांची टीका, ऋतुराजला राखीव खेळाडूंतूनही वगळल्यामुळे नाराजी

शुभमन गिल ४ ते ५ डावांनंतर एखाद्या सामन्यात चमकदार कामगिरी करतो.
गिलचे अतिकौतुक महागात पडेल; श्रीकांत यांची टीका, ऋतुराजला राखीव खेळाडूंतूनही वगळल्यामुळे नाराजी
Published on

चेन्नई : शुभमन गिल ४ ते ५ डावांनंतर एखाद्या सामन्यात चमकदार कामगिरी करतो. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने इतकी छापही पाडलेली नाही. मात्र फक्त नावाच्या बळावर त्याला टी-२० विश्वचषकासाठी किमान राखीव खेळाडूंत स्थान मिळालेले आहे. ऋतुराज गायकवाड त्याच्यापेक्षा या जागेचा हकदार होता, असे स्पष्ट मत भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले.

अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २ जूनपासून टी-२० विश्वचषक रंगणार असून या स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला. गिलचा १५ खेळाडूंत समावेश नसला तरी तो अन्य ४ राखीव खेळाडूंत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गिलने गुजरातकडून १० सामन्यांत ३२० धावा केल्या असून यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याउलट चेन्नईचा कर्णधार ऋतुराज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे. ऋतुराजने १० सामन्यांत ४ अर्धशतके व १ शतकाच्या बळावर तब्बल ५०९ धावा कुटल्या आहेत. त्यामुळेच ६४ वर्षीय श्रीकांत यांनी ऋतुराज संघात असायला हवा होता, असे मत नोंदवले.

“गिल सध्या फॉर्मात नाही. तरीही तो राखीव खेळाडूंत आहे. ४ ते ५ सामन्यांनंतर तो एक खेळी साकारतो आणि मग सर्वजण त्याची तुलना विराट कोहलीशी करतात. त्याला प्रिन्स असे संबोधतात. मात्र गिलच्या जागी ऋतुराजचा किमान राखीव खेळाडूंत समावेश होणे अपेक्षित होते. टी-२०मध्ये तुम्ही खेळाडूच्या नावावर नाही, तर त्याच्या कामगिरीवर निवड केली पाहिजे,” असे श्रीकांत म्हणाले. मुख्य म्हणजे बराच काळ अपयशी ठरूनही गिलला भारताच्या तिन्ही संघांत स्थान लाभते. यावरूनच तो बीसीसीआयचा लाडका आहे का, असा प्रश्न पडल्याचेही श्रीकांत यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in