
भारताची दुहेरी ऑलिम्पिकपदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बुधवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. परंतु भारताची अन्य आघाडीची खेळाडू सायना नेहवालला आणखी एका स्पर्धेत सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.
सातव्या मानांकित सिंधूने ७५० सुपर दर्जाच्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या पहिल्या लढतीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवांगला २१-१३, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. सिंधूने अवघ्या ३७ मिनिटांत हा सामना जिंकला. गुरुवारी दुसऱ्या फेरीत तिच्यासमोर थायलंडच्याच फिट्यापोर्न चैवानचे आव्हान असेल.
३२ वर्षीय सायनाला मात्र अमेरिकेच्या इरिस वांगने २१-११, २१-१७ असे सहज नमवले. त्यामुळे सायनाच्या कारकीर्दीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुरुष एकेरीत सायनाचा पती म्हणजेच पारुपल्ली कश्यपने दुखापतीतून सावरत झोकात पुनरागमन करताना कोरियाच्या हिओ क्वांगवर २१-१२, २१-१७ असा विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. कश्यपची पुढील फेरीत थायलंडच्या कन्लावत विटीसर्नशी गाठ पडेल. भारताच्या एच. एस. प्रणॉयने मंगळवारी विजयी सलामी नोंदवली होती.