टुर्कू (फिनलँड) : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीतून सावरत पुनरागमनासाठी सज्ज आहे. नीरज मंगळवारी पावो नुरमी ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणार असून पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी पुन्हा लय मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.
२६ वर्षीय नीरज हा या स्पर्धेत सहभागी होणारा एकमेव भारतीय खेळाडू असेल. नीरजला स्नायूंच्या दुखापतीमुळे ओस्ट्रावा येथील स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यापूर्वी मे महिन्यात नीरजने डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात दुसरे स्थान पटकावले. तर भुवनेश्वर येथील फेडरेशन चषक स्पर्धेत सहज सुवर्णपदक काबिज केले. ३ वर्षांनी प्रथमच नीरज भारतात खेळला होता. मात्र या स्पर्धेनंतरच सराव करताना नीरजचे स्नायू ताणले गेले होते.
दरम्यान, पावो नुरमी स्पर्धेत नीरजला जर्मनीच्या १९ वर्षीय मॅक्स डेनिंगकडून कडवे आव्हान मिळेल. मॅक्सने काही महिन्यांपूर्वी ९० मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली होती. तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीसुद्धा पात्र ठरला आहे. त्यामुळे तेथेही नीरजला तो कडवी झुंज देऊ शकतो. त्याशिवाय २०२२चा विजेता ओलिव्हर हेलँडर नीरजच्या मार्गात अडथळा ठरू शकतो. २०२२मध्ये नीरजला ८९.३० मीटरच्या भालाफेकीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०२३मध्ये नीरज या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. नीरजने २०२२च्या डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर भालाफेक केली होती. ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे यंदा तो ९० मीटरचे अंतर गाठण्यासाठी आतुर आहे. २६ जुलैपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून त्यापूर्वी नीरज ७ जुलै रोजी डायमंड लीगच्या पॅरिस येथील टप्प्यातही खेळणार आहे.