पाकिस्तानची अखेर माघार; आयसीसी, बीसीबीसह झालेल्या बैठकीनंतर भारताविरुद्ध खेळण्यास राजी

अखेर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) माघार घेत भारताविरुद्ध सामना खेळण्यास होकार दिला आहे. पीसीबी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने बहिष्कार मागे घेत उर्वरित सामने ठरल्याप्रमाणे खेळण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे रविवार, १५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान लढत वेळापत्रकानुसार होणार आहे.
पाकिस्तानची अखेर माघार; आयसीसी, बीसीबीसह झालेल्या बैठकीनंतर भारताविरुद्ध खेळण्यास राजी
पाकिस्तानची अखेर माघार; आयसीसी, बीसीबीसह झालेल्या बैठकीनंतर भारताविरुद्ध खेळण्यास राजीPhoto : X
Published on

नवी दिल्ली : अखेर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) माघार घेत भारताविरुद्ध सामना खेळण्यास होकार दर्शवला आहे. पीसीबी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने बहिष्कार मागे घेत स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने ठरल्याप्रमाणे खेळण्याची शाश्वती दिली आहे. त्यामुळे आता रविवार, १५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान लढत वेळापत्रकानुसार होणार आहे.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

दरम्यान, भारताविरुद्ध आगामी टी-२० विश्वचषकातील सामना न खेळल्यास पाकिस्तानला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकणार होते. तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी मतावर ठाम राहत भारताविरुद्ध न खेळण्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले. जवळपास गेले १० दिवस विविध नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्यावर पाकिस्तानने त्यांना पाठिंबा देत भारताविरुद्ध खेळण्यास नकार दर्शवला होता.

सोमवारी कराची येथे आयसीसी, पीसीबी, बीसीबी, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर पीसीबीने पंतप्रधान शरीफ यांना बैठकीत झालेल्या चर्चेची कल्पना दिली. तसेच श्रीलंका, यूएई मंडळांनीदेखील पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळावे, अशी विनंती केल्याचे पीसीबीने म्हटले आहे. त्याशिवाय बांगलादेशवर माघार घेतल्याबद्दल आयसीसीने कोणतीही कारवाई केलेली नाही. या सर्व मुद्द्यांनंतर पीसीबीने अखेर भारताविरुद्ध खेळण्यास होकार दर्शवला.

आयसीसीशी २०२७पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाही टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. तसेच पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. आयसीसीला जागतिक स्पर्धेत सर्वाधिक महसूल हा भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे मिळतो. पाकिस्तानने ही लढत न खेळल्यास आयसीसी त्यांना स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर देखील करू शकते.

त्याशिवाय पाकिस्तानला प्रक्षेपणकर्ते स्टार स्पोर्ट्स समूहाला नुकसानभरपाई द्यावी लागणार होती. बांगलादेशप्रमाणेच त्यांच्यावरही द्विराष्ट्रीय मालिकांवर निर्बंध येतील. पाकिस्तान सुपर लीगमध्ये विदेशी खेळाडूंना खेळण्यास आयसीसी मनाई करू शकते. त्यामुळे एकूणच आयसीसीचे न ऐकल्यास पाकिस्तानला मोठा फटका पडण्याची शक्यता होती.

पाकिस्तानच्या या मागण्या मात्र अमान्यच

  • बैठकीदरम्यान भारताविरुद्धच्या लढतीदरम्यान तसेच लढतीनंतर खेळाडूंनी हस्तांदोलन करावे, अशी मागणी पीसीबीने केली होती. मात्र आयसीसीने ती फेटाळून लावत हा निर्णय बीसीसीआयचा असेल असे सांगितले.

  • तसेच भारताविरुद्ध द्विराष्ट्रीय अथवा तिरंगी मालिका आयोजित करण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र आयसीसीने तीसुद्धा फेटाळून लावली आहे. त्याशिवाय आयसीसीच्या वार्षिक महसुलातील पीसीबीचा हिस्सा वाढवण्यासही आयसीसीने नकार दिला आहे.

वादाच्या पार्श्वभूमीचा आढावा

  • बांगलादेशने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली असून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे आयपीएल २०२६च्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात कोलकाता संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी इतकी बोली लावून खरेदी केले. मात्र बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असणाऱ्या अत्याचाराविरोधात तेथील खेळाडूंना आयपीएलमध्ये घेऊ नये, या मागणीने जोर धरला.

  • परिणामी बीसीसीआयला आठवडाभरातच याची दखल घ्यावी लागली व त्यांनी रहमानला संघातून काढण्याचे आदेश कोलकाताला दिले. कोलकातानेदेखील देशभावना समजून हा निर्णय मान्य केला. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट मंडळाने मात्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी टी-२० विश्वचषकातील भारतात होणारे सामने अन्य ठिकाणी खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केली. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावल्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेण्याची भीती दर्शवली. तेव्हाही आयसीसीने बांगलादेशच्या खेळाडूंना, तेथील चाहत्यांना किंवा पत्रकारांना भारतात धोका नसेल, याची हमी दिली. तसेच ठराविक वेळेत निर्णय न घेतल्यास बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा विश्वचषकात समावेश केला जाईल, असेही स्पष्ट केले.

  • अखेरीस बांगलादेश निर्णयावर ठाम राहिल्याने आयसीसीने त्यांची गच्छंती केली. यामुळे बांगलादेश क्रिकेटचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानने बांगलादेशचे सामने त्यांच्या येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव सुचवला होता. तसेच बांगलादेशची हकालपट्टी झाल्यामुळे पाकिस्ताननेही आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून माघार घेण्याचे संकेत दिले होते. तूर्तास मात्र पाकिस्तानने स्पर्धेतील सर्व सामने खेळण्याचे ठरवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in