पाकिस्तानचा ५५ धावांत खुर्दा; श्री चरणी आणि प्रेमा रावतच्या फिरकीपुढे पाकिस्तानचे फलंदाज गारद

डावखुरी फिरकीपटू श्री चरणी हिची (७ धावांत ३ बळी) चमकदार कामगिरी आणि नवोदित लेगस्पिनर प्रेमा रावतच्या (९ धावांत ३ बळी) उत्कृष्ट साथीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तानचा अवघ्या ५५ धावांत धुव्वा उडवला.
पाकिस्तानचा ५५ धावांत खुर्दा; श्री चरणी आणि प्रेमा रावतच्या फिरकीपुढे पाकिस्तानचे फलंदाज गारद
पाकिस्तानचा ५५ धावांत खुर्दा; श्री चरणी आणि प्रेमा रावतच्या फिरकीपुढे पाकिस्तानचे फलंदाज गारद(Photo-X)
Published on

दुबई : डावखुरी फिरकीपटू श्री चरणी हिची (७ धावांत ३ बळी) चमकदार कामगिरी आणि नवोदित लेगस्पिनर प्रेमा रावतच्या (९ धावांत ३ बळी) उत्कृष्ट साथीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तानचा अवघ्या ५५ धावांत धुव्वा उडवला. भारताने हे आव्हान ३ विकेट्सच्या मोबदल्यात ८.४ षटकांत पार केले. १८.१ षटकांत पाकिस्तानचा संपूर्ण संघ ५५ धावांवर तंबूत परतला. ही आंतरराष्ट्रीय द्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील पाकिस्तानची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. ५६ धावांचे आव्हान पार करताना भारताची सुरुवातही निराशाजनक झाली. शफाली वर्मा (१२), स्मृती मानधना (९) आणि प्रतिका रावल (४) लवकर बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद १८) आणि दीप्ती शर्मा (नाबाद १२) यांनी भारताला विजय मिळवून दिला. भारताने सात विकेट्सनी पाकिस्तानचा पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने सुरवातीला ४ षटकांत बिनबाद २७धावा करत आश्वासक सुरुवात केली होती.

सलामीवीर मुनिबा अली (१३) आणि शवाल झुल्फिकार (१४) यांनी सुरुवातीला धावा जमवल्या; मात्र या दोघांव्यतिरिक्त पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारतीय फिरकीपटूंनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत तब्बल ७८ चेंडू निर्धाव टाकले. आपला १५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणारी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने खेळपट्टीचा अंदाज घेऊन लगेचच फिरकीपटूंना पाचारण केले. भारतीय फिरकीच्या तावडीत सापडलेल्या पाकिस्तानने अवघ्या ९ धावांच्या मोबदल्यात ६ बळी गमावले आणि १० षटकांत ६ बाद ३६ अशी त्यांची दैना झाली. मुनिबा अली पायचीत झाली, तर श्री चरणीने गुल फेरोझा (०) आणि झुल्फिकारला माघारी धाडले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in