टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावरून पाकिस्तान सरकारने अखेर अपेक्षेप्रमाणे पलटी मारली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) १५ फेब्रुवारीच्या सामन्यासाठी 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. सोमवारी रात्री उशीरा पाकिस्तानच्या सरकारने अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ही घोषणा केली.
आयसीसीच्या दबावामुळे, संभाव्य निर्बंधांच्या धमकीमुळे आणि श्रीलंका व यूएई क्रिकेट बोर्डांनी केलेल्या विनंतीमुळे पाकिस्तानने आपला निर्णय मागे घेतला आहे. 'खेळ भावना' जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पाकिस्तान सरकारने म्हटलं आहे. रविवारी आयसीसीचे चार जणांचे प्रतिनिधिमंडळ लाहोरमध्ये गेले होते. तेथे झालेल्या मिटिंगमध्ये पीसीबीला संभाव्य परिणामांची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर पाकची भूमिका नरमली.
"हमने अपने लिए कुछ नहीं किया"
लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत भारताविरुद्ध खेळण्यासाठी पीसीबीने ठेवलेल्या मागण्याही आयसीसीने धुडकावल्या. तथापि, बांगलादेशच्या बाबतीत केलेल्या काही मागण्या मात्र मान्य करण्यात आल्या. याबाबत मोहसिन नक्वी यांची एक प्रतिक्रिया आता चांगलीच व्हायरल झाली आहे. आयसीसीसोबत वाटाघाटींमध्ये पीसीबीला स्वतःसाठी काय मिळालं? असा थेट प्रश्न एका पाकिस्तानी पत्रकाराने नक्वी यांना विचारला. त्यावर, आम्ही आमच्यासाठी काहीही मागितले नव्हते, असे म्हणत नक्वी यांनी आपली नामुष्की झाकण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. "आम्ही बांगलादेशसाठी भूमिका घेतली होती. त्यांचाच विषय होता, आम्ही स्वतःसाठी काहीच घेतलं नाही", असे ते म्हणाले.
पीसीबीच्या मागण्या धुडकावल्या; केवळ बांगलादेशबाबतच्या मागण्या मान्य
खरंतर ऐनवेळी बहिष्काराची धमकी देऊन नक्वी यांनी आयसीसीला कोंडीत पकडून, 'पाकिस्तानचा मोबदला वाढवा, भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका आयोजित करा' अशा काही मागण्या केल्या होत्या, असे समजते. तथापि, केवळ बांगलादेशच्या बाबतीत केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यात बांगलादेशला दंड आकारला जाणार नाही आणि भविष्यातही बांगलादेशला स्पर्धा खेळवण्याची संधी दिली जाईल, अशा काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
टी-२० विश्वचषकातून बांगलादेशला वगळल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने १ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. आता अखेर या सामन्यावरील अनिश्चिततेचे ढग दूर झाले आहेत.