
दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी तब्बल ५०८ धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्या डावात ९ बाद ८९ धावांपर्यंत दमदार मजल मारली होती. शेवटच्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी आणखी ४१९ धावांची आवश्यकता आहे, तर श्रीलंकेला आणखी नऊ फलंदाज बाद करावे लागणार आहेत.
श्रीलंकेने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचा डाव २३१ धावात गुंडाळत पहिल्या डावात १४७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात धनंजया डिसिल्वाच्या शतकी (१७१ चेंडूंत १०९) खेळीच्या जोरावर श्रीलंकेला आव्हानात्मक लक्ष्य निश्चित करता आले. श्रीलंकेने आपला दुसरा डाव ८ बाद ३६० धावांवर घोषित केला. श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने आणि धनंजया डिसिल्वा यांनी श्रीलंकेचा डाव ५ बाद १७५ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार करुणारत्ने ६८ व्या षट्कात (१०५ चेंडूंत ६१) करून बाद झाला. डिसिल्वाने कसोटीतील आपले नववे शतक झळकाविले.
श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिनेश चंदीमल सर्वाधिक (१३७ चेंडूंत ८०) धावा केल्या. निरोशन डिक्वेला (५४ चेंडूंत ५१) आणि सलामीवीर ओशादा फर्नांडोने (७० चेंडूंत ५०) यांनी अर्धशतकी योगदान दिले. करुणारत्ने आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी अनुक्रमे ४० आणि ४२ धावा केल्या. पाकिस्तानकडून यासीर शाह आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
यानंतर श्रीलंकेने पाकिस्तानचा पहिला डाव २३२ धावात संपुष्टात आणला. रमेश मेंडीसने भेदक मारा करत ४७ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या तर प्रभात जयसूर्याने ८० धावा देत तीन विकेट्स मिळविल्या. पाकिस्तानकडून आघा सलमानने सर्वाधिक ६२ धावा केल्या.
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना चार विकेट्सने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दोन सामन्यांची ही मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेला दुसरा सामना जिंकणे आवश्यक आहे.