

कोलंबो : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारपासून चाहत्यांना सुपर-आठ फेरीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर शनिवारी सुपर-आठ फेरीच्या दुसऱ्या गटातील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड एकेमकांविरुद्ध उभे ठाकतील. या लढतीत प्रामुख्याने पाकिस्तानच्या फिरकीपटूंविरुद्ध किवी फलंदाजांचा कस लागणार आहे.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ आहेत. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.
दरम्यान, सलमान अघाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानने साखळी फेरीत चारपैकी तीन सामने जिंकून अ-गटात दुसरे स्थान मिळवले. भारताविरुद्ध त्यांची फलंदाजी ढेपाळली, तर नेदरलँड्सने त्यांना विजयासाठी झुंजवले होते. नामिबिया व अमेरिकाविरुद्ध मात्र पाकिस्तानने एकतर्फी विजय मिळवला. साखळी फेरीप्रमाणेच या फेरीतही पाकिस्तानचा संघ सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो किंवा पाल्लेकेले येथे खेळणार आहे. येथील खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना भरपूर सहाय्य लाभत आहे. त्यामुळे १६० ते १७० धावाही विजयासाठी पुरेशा ठरत आहेत. अशा स्थितीत आपल्या गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत असलेला उस्मान तारिक, सय्यम अयूब, शादाब खान, मोहम्मद नवाझ या फिरकीपटूंविरुद्ध किवी फलंदाजांची नक्कीच कसोटी लागेल.
दुसरीकडे मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडने ड-गटातून दुसरे स्थान प्राप्त करताना अफगाणिस्तान, यूएई व कॅनडा या संघांना धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या लढतीत सँटनरच्या अनुपस्थितीत डॅरेल मिचेलने किवी संघाचे नेतृत्व केले होते. मात्र या लढतीसाठी सँटनर परतणार आहे. सँटनरसह लेगस्पिनर इश सोधी व युवा ऑफस्पिनर कोल मॅकोन्ची यांचे त्रिकुटही पाकिस्तानी फलंदाजांना वेसण घालण्यास आतुर असतील.
फलंदाजीचा विचार करता पाकिस्तानला गेल्या लढतीतील शतकवीर साहिबझादा फरहानकडून पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी अपेक्षित आहे. कर्णधार सलमान व सय्यम अयूब मात्र संघर्ष करत आहेत. शादाब खान व उस्मान खान यांनी फलंदाजीत नक्कीच योगदान दिले आहे. बाबर आझमला गेल्या लढतीत फलंदाजीची संधी लाभली नाही. त्याच्यावर पुन्हा लक्ष असेल.
न्यूझीलंडला फलंदाजीमध्ये ग्लेन फिलिप्स हुकमी एक्का ठरत आहे. त्याशिवाय डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र व डॅरेल मिचेल असे फिरकीला उत्तमरित्या खेळणारे फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. टिम सेईफर्ट व फिन ॲलन यांची आक्रमक सलामी जोडी टिकली, तर किवी संघाला रोखणे कठीण जाऊ शकते.
खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज
भारत-पाकिस्तान, झिम्बाब्वे-ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे-श्रीलंका यांसारख्या लढती कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकात झाल्या असून सायंकाळच्या वेळेस येथे फिरकीपटूंना पुरेसे सहाय्य लाभते.
मात्र दव येण्याचीही शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. लढतीवर ३० टक्के पावसाचे सावट आहे. मात्र लढत पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
पाकिस्तान : सलमान अघा (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, ख्वाजा नफाय, साहिबझादा फरहान, उस्मान खान, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाझ, सय्यम अयूब, शादाब खान, अब्रार अहमद, नसीम शाह, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), रचिन रवींद्र, कायले जेमिसन, फिन ॲलन, मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स, जेकब डफी, टिम सेईफर्ट, जेम्स नीशाम, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, डेवान कॉन्वे, कोल मॅकोन्ची.