'चॅम्पियन्स'च्या किताबासाठी आजपासून चुरस; पाकिस्तान-न्यूझीलंड लढतीद्वारे Champions Trophy च्या नवव्या पर्वाला प्रारंभ

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बुधवारपासून जगभरातील तमाम क्रीडाप्रेमींना अव्वल ८ संघांमधील ‘रन’संग्राम पाहायला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या या स्पर्धेचे यंदा पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात येत आहे. मात्र भारतीय संघ ठरल्याप्रमाणे त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
'चॅम्पियन्स'च्या किताबासाठी आजपासून चुरस; पाकिस्तान-न्यूझीलंड लढतीद्वारे Champions Trophy क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वाला प्रारंभ
'चॅम्पियन्स'च्या किताबासाठी आजपासून चुरस; पाकिस्तान-न्यूझीलंड लढतीद्वारे Champions Trophy क्रिकेट स्पर्धेच्या नवव्या पर्वाला प्रारंभX - @ICC
Published on

कराची : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बुधवारपासून जगभरातील तमाम क्रीडाप्रेमींना अव्वल ८ संघांमधील ‘रन’संग्राम पाहायला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या या स्पर्धेचे यंदा पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात येत आहे. मात्र भारतीय संघ ठरल्याप्रमाणे त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. तब्बल ८ वर्षांनी रंगणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एकदिवसीय प्रारूपात (५० षटकांचे सामने) खेळवण्यात येणार आहे. बुधवारी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर रंगणाऱ्या उद्घाटनीय लढतीत यजमान पाकिस्तानची न्यूझीलंडशी गाठ पडेल.

यापूर्वी २०१७मध्ये अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला नमवले होते. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अव्वल ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी थेट पात्र धरले. त्यापैकी अ-गटात भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान हे संघ असतील. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पर्धेचे सुरळीतपणे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. काही प्रमुख खेळाडूंनी दुखापतीमुळे, तर काहींनी वैयक्तिक कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

पाकिस्तानमधील सुरक्षा आणि दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध यामुळे भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. केंद्र शासनानेच भारतीय संघाला तसे आदेश दिले. यानंतर आयसीसीने डिसेंबरमध्ये पीसीबीला संमिश्र प्रारूपाचा प्रस्ताव स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर बीसीसीआय व पीसीबी यांनी आयसीसीशी आणखी एक करार केला. त्यानुसार आता पाकिस्तानमधील आयसीसी स्पर्धेसाठी भारतीय संघ तेथे जाणार नाही. तसेच भारतातील आयसीसी स्पर्धेसाठीही पाकिस्तानचा महिला अथवा पुरुष संघ आपल्या देशात येणार नाही. आयसीसीने व पीसीबीमध्ये झालेल्या करारानुसार भारतात होणाऱ्या २०२६चा टी-२० विश्वचषक व २०२५च्या महिलांच्या विश्वचषकात पाकिस्तानचे सामने अन्य देशात खेळवण्यात येणार आहेत.

२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात. तसेच २०१२ नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात एखादी मालिकासुद्धा झालेली नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा उभय संघांमधील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि इतिहास!

* १९९८पासून आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे नववे पर्व आहे. एकदिवसीय स्वरूपात म्हणजेच प्रत्येकी ५० षटकांचे सामने याप्रमाणे ही स्पर्धा खेळवण्यात येते.

* २०१७ नंतर प्रथमच म्हणजे आठ वर्षांनी ही स्पर्धा रंगणार आहे. २०१७मध्ये पाकिस्तानने भारताला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती.

* २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात गुणतालिकेत पहिल्या आठ स्थानी असलेले संघ २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी थेट पात्र ठरले.

* आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून एका संघाला तीन साखळी सामने खेळायचे आहेत. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

* सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होणार असून स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲपवर स्पर्धेचे ९ विविध भाषांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

बाबर-विल्यम्सन यांच्याकडे लक्ष

कराची : कराची येथील द नॅशनल बँक स्टेडियमवर रंगणाऱ्या पहिल्या लढतीत गतविजेत्या पाकिस्तानसमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल. या लढतीत प्रामुख्याने बाबर आझम आणि केन विल्यम्सन या तारांकित फलंदाजांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानला नुकताच तिरंगी मालिकेत न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र आता ते नव्या जोमाने खेळतील. सय्यम अयूब स्पर्धेबाहेर गेल्याने बाबर या स्पर्धेत सलामीला येणार आहे. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह व हॅरिस रौफ यांच्यावर पाकिस्तानची गोलंदाजी अवलंबून आहे. रौफ या लढतीसाठी तंदुरुस्त आहे.

दुसरीकडे मिचेल सँटनर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणार आहे. रचिन रवींद्रबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्याला क्षेत्ररक्षण करतानाच डोक्यावर चेंडू लागला होता. डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स उत्तम लयीत आहेत. ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत मॅट हेन्री व कायले जेमिसन यांच्यावर न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याची भिस्त असेल. पाकिस्तानमधील वेळेनुसार दुपारी २ वाजता, तर भारतीय वेळेनुसार २.३० वाजता लढत सुरू होईल.

प्रतिस्पर्धी संघ

पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, कामरान घुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अघा, उस्मान खान, अब्रार अहमद, हॅरिस रौफ, मोहम्मद हस्नैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, केन विल्यम्सन, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, विल ओरूर्क, विल यंग, मार्क चॅपमन, नॅथन स्मिथ, जेकब डफी, कायले जेमिसन.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in