विश्वचषकातून माघार घेतल्यास पाकिस्तानचेच नुकसान - अक्रम

मुंबई असो किंवा अहमदाबाद; आमचे खेळाडू कुठेही खेळण्यास तयार असल्याचे मत
विश्वचषकातून माघार घेतल्यास पाकिस्तानचेच नुकसान - अक्रम

कराची : राजकीय संबंध किंवा अहंकारामुळे पाकिस्तानने आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतल्यास देशातील क्रिकेटचे प्रचंड नुकसान होईल. तसेच पाकिस्तान संघातील खेळाडू मुंबई असो किंवा अहमदाबाद, कुठेही खेळण्यास सज्ज आहेत, असे स्पष्ट मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने व्यक्त केले.

आयसीसीने मंगळवारी विश्वचषकाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतरही पाकिस्तानच्या विश्वचषकातील समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानेसुद्धा (पीसीबी) संघ स्पर्धेत सहभागी होईल की नाही, याविषयीचा निर्णय पूर्णपणे शासनाचा असल्याचे सांगितले. त्यावरून आता ५७ वर्षीय अक्रमने पाकिस्तान शासन तसेच पीसीबीवरही ताशेरे ओढले आहेत.

“पाकिस्तान संघातील प्रत्येक खेळाडू भारतातील कोणत्याही स्टेडियमवर खेळण्यास सज्ज आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यांना मैदानाबाहेरील गोष्टींशी काहीही फरक पडत नाही. मात्र विश्वचषकासारख्या स्पर्धेतून माघार घेणे पाकिस्तानला परवडणारे नाही. पाकिस्तानने आधी योजना आखावी. त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा विचार करावा. आपले देशभक्त असणे आपल्या देशासाठी घातक ठरणार नाही, याकडे लक्ष द्यावे,” असे अक्रम म्हणाला.

त्याशिवाय वेळापकातील काही सामने बदलण्याबाबत पीसीबीने आयसीसीकडे केलेल्या विनंतीवरूनही अक्रमने फटकारले. यामुळे तुम्ही अन्य संघाला घाबरत असून तुमच्याच संघातील खेळाडूंच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असेही अक्रमने नमूद केले.

पाकिस्तानच्या गोलंदाजांची भारतात चर्चा

शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह या युवा आणि वेगवान गोलंदाजांची भारतातही चर्चा होते. भारतीय खेळाडूंवर नक्कीच पाकिस्तानच्या गोलंदाजांचे दडपण असेल. उपखंडातील खेळपट्ट्या साधारणपणे सारख्याच असतात. त्यामुळे पाकिस्तानला नक्कीच या विश्वचषकात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्याभोवती पाकिस्तानचे अन्य फलंदाज जबाबदारीने खेळल्यास त्यांना रोखणे खरंच अवघड असेल, असे अक्रमने आवर्जून सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in