पंतचे पुनरागमन अयशस्वी; पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सनी विजय

सॅम करण आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सनी विजय साकारला.
पंतचे पुनरागमन अयशस्वी; पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सनी विजय
Published on

चंडीगढ : अपघातातून बालंबाल बचावलेल्या आणि जवळपास कित्येक महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणारा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याचे पुनरागमन अयशस्वी ठरले. सॅम करण आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सनी विजय साकारला.

दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेले १७५ धावांचे आव्हान पार करताना सॅम करणने ४७ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारानिशी ६३ धावांची खेळी केली. त्याला लिव्हिंगस्टोनने चांगली साथ देताना २१ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३८ धावांचे योगदान दिले. पंजाबने हे आव्हान ४ विकेट्स आणि ४ चेंडू राखून पार केले.

नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर (२९) आणि मिचेल मार्श (२०) यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर शाय होपने केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीचा संघ १०.३ षटकांत २ बाद ९४ अशा भक्कम स्थितीत होता. होपने २५ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावा फटकावल्या. मात्र त्यानंतर दिल्लीची फलंदाजी कोलमडली. ऋषभ पंत अवघ्या १८ धावा काढून माघारी परतला. नवव्या क्रमांकावर दिल्लीने अभिषेक पोरेलच्या रूपाने ‘ट्रम्पकार्ड’ उतरवले. त्याने १० चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ३२ धावा फटकावल्या. त्यामुळे दिल्लीला पावणेदोनशे धावांपर्यंत झेप घेता आली.

हे उद्दिष्ट गाठताना कर्णधार शिखर धवनने पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. मात्र धवन (२२) आणि जॉनी बेअरस्टो (९) झटपट माघारी परतल्यावर प्रभसिमरन सिंग (२६) आणि करण यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भर घातली. त्यानंतर करणने पाचव्या विकेटसाठी लिव्हिंगस्टोन याच्यासह ६७ धावांची मोलाची भर घालत पंजाबला विजयासमीप आणले. लिव्हिंगस्टोनने एक बाजू लावून धरत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव आणि खलिल अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.

logo
marathi.freepressjournal.in