ट्वेन्टी-२० मालिकेत पंतच्या दुहेरी कौशल्याची कसोटी लागणार

फलंदाज म्हणून छाप पाडण्यासह पंतला संघाचे विजयी नेतृत्व करण्यासाठी योग्य डावपेच आखावे लागतील.
ट्वेन्टी-२० मालिकेत पंतच्या दुहेरी कौशल्याची कसोटी लागणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघ सध्या १-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या चौथ्या ट्वेन्टी-२० लढतीत कर्णधार ऋषभ पंतच्या दुहेरी कौशल्याची कसोटी लागेल. फलंदाज म्हणून छाप पाडण्यासह पंतला संघाचे विजयी नेतृत्व करण्यासाठी योग्य डावपेच आखावे लागतील. त्यामुळे सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींचे त्याच्याकडे लक्ष लागले आहे.

पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने दिल्ली आणि कटक येथे झालेले सामने गमावले. परंतु विशाखापट्टणम येथे तिसरी लढत जिंकून भारताने मालिकेतील आव्हान कायम राखले. परंतु या मालिकेत पंतला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याशिवाय सलग तीनही सामन्यांत त्याने नाणेफेकीचा कौल गमावला आहे. ट्वेन्टी-२० सामन्यात नाणेफेक निर्णायक ठरत असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसून आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल यांसारख्या प्रुमख खेळाडूंच्या अनुपस्थितीत पंत संघातील अनुभवी फलंदाज असल्याने तो क्षेत्ररक्षणादरम्यान व्यूहरचना आखण्यासह फलंदाजीत कशाप्रकारे योगदान देतो, यावर भारताचे भवितव्य अवलंबून असेल.

ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन ही भारतीय सलामीवीरांची जोडी उत्तम लयीत आहे. दोघांनीही गेल्या सामन्यात अर्धशतके झळकावल्याने अन्य कुणालाही संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. मधल्या फळीत हार्दिक पंड्याही उत्तम भूमिका बजावत आहे. दिनेश कार्तिकही फिनीशर म्हणून छाप पाडत आहे. गोलंदाजीत लेगस्पिनर यजुवेंद्र चहल आणि मध्यमगती वेगवान गोलंदाज हर्षल पटेल भारताची धुरा वाहत आहेत. अक्षर पटेलच्याऐवजी रवी बिश्नोईला खेळवता येऊ शकते. परंतु मालिकेच्या दृष्टीने ही महत्त्वाची लढत असल्याने संघ व्यवस्थापन अंतिम ११ खेळाडूंमध्ये फारसा बदल करण्याची शक्यता कमी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in