Paralympic Games Paris 2024: पॅरा-बॅडमिंटनपटू प्रमोदवर १८ महिन्यांची बंदी

भारताचा पॅरा-बॅडमिंटनपटू प्रमोद भगतवर उत्तेजकविरोधी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
Paralympic Games Paris 2024: पॅरा-बॅडमिंटनपटू  प्रमोदवर १८ महिन्यांची बंदी
PTI
Published on

नवी दिल्ली : भारताचा पॅरा-बॅडमिंटनपटू प्रमोद भगतवर उत्तेजकविरोधी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे २८ ऑगस्टपासून रंगणाऱ्या पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत प्रमोद सहभागी होऊ शकणार नाही. भारतीय बॅडमिंटनला हा एकप्रकारे मोठा धक्का मानला जात आहे.

३६ वर्षीय प्रमोदने गेल्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावले. मात्र जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) नियमानुसार खेळाडूला एका वर्षभरात फक्त दोन वेळा उत्तेजकविरोधी चाचणीसाठी मुभा मिळू शकते. तसेच त्याने वर्षभरात तो चाचणीच्या वेळी कुठे होता किंवा चाचणीस का सामोरा जाऊ शकला नाही, याचा तपशील सादर करणे गरजेचे आहे. प्रमोदने १२ महिन्यांच्या कालावधीत ३ वेळा त्याचा ठावठिकाणा कुठे होता, याची माहिती महासंघाला दिली नाही. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

१ मार्च, २०२४ रोजी उत्तेजकविरोधी चाचणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमोद अनुपस्थितीत होता. तसेच तो नेमका कुठे आहे, याचीही त्याने माहिती न दिल्याने महासंघाने बंदी लादली असून पुढील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत ही बंदी कायम असेल. प्रमोद हा एसएल ३ प्रकारात बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. ५ वर्षांचा असताना पोलिओ झाल्याने त्याचा डाव पाय निकामी झाली. प्रमोदने २०१८ व २०२२च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यासह कारकीर्दीत पाच वेळा जागतिक सुवर्णही काबिज केले आहे.

प्रमोदच्या निलंबनामुळे भारताला निश्चितच एका पदकाला मुकावे लागणार असून याविषयी आता न्यायालयीन लढाई रंगणार आहे.

तांत्रिक चुकीचा फटका : प्रमोद

“महासंघाच्या या निर्णयामुळे मला फार दु:ख झाले आहे. कारण यावेळी तांत्रिक कारणामुळे माझी चाचणी होऊ शकली नाही. दोन वेळा मी अन्य ठिकाणी असल्याने चाचणीस अनुपस्थितीत होतो. मात्र यावेळी खरंच माझी चूक नव्हती,” असे मत प्रमोदने व्यक्त केले. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी मी फार तयारी करत होतो. मला पदक मिळवण्याचाही विश्वास होता. मात्र माझे स्वप्न भंगले असून मी याविरोधात लढा देईन, असेही प्रमोदने नमूद केले. प्रमोदने फेब्रुवारीत पाचव्यांदा जागतिक जेतेपद मिळवून चीनच्या लिन डॅनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. भारतीय पॅरा-बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक गौरव खन्ना यांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in