पॅरिस : पायाने लक्ष्यभेद करणारी भारताची तिरंदाज शीतल देवीने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील मानांकन फेरीत दमदार कामगिरीच्या आधारे थेट उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारातील वैयक्तिक गटाच्या मानांकन फेरीत १७ वर्षीय शीतलने दुसरे स्थान पटकावले.
जम्मू आणि काश्मीरची रहिवासी असलेल्या शीतलने मानांकन फेरीत ७२० पैकी ७०३ गुण कमावले. ती अग्रस्थान मिळवलेल्या तुर्कीच्या ओझनूर गिर्दी क्यूरेपासून केवळ एका गुणाने मागे राहिली. ओझनूरने ७०४ गुणांसह मानांकन फेरीतील जागतिक विक्रम प्रस्थापित केला. याआधी जागतिक विक्रम ग्रेट ब्रिटनच्या फिबी पाइन पॅटरसनच्या नावे होता. तिने याच महिन्यात ६९८ गुणांचा वेध घेतला होता. मात्र, तिच्या या विक्रमाला शीतल आणि ओझनूर या दोघींनीही मागे टाकले.
मानांकन फेरीत अव्वल चार स्थानांवर राहिलेल्या तिरंदाज थेट उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्या. या फेरीत शीतलसमोर टोकियो पॅरालिम्पिक रौप्यविजेती चिलीची मारिआना झुनिगा आणि कोरियाची चोई ना मी यांच्यातील विजेतीचे आव्हान असेल.
शीतलविषयी महत्त्वाचे
जन्मापासूनच हात नसलेली शीतल पायाने लक्ष्यभेद करते. गेल्या वर्षी हांगझो येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर शीतल प्रकाशझोतात आली होती.
त्या स्पर्धेत शीतलने दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती आणि अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला पॅरा-खेळाडू ठरली होती.
तिने आणखी एक रौप्यपदकही पटकावले होते. आता पॅरालिम्पिकमध्येही पदक जिंकण्याचा तिचा मानस आहे.