Paralympic Games Paris 2024: सोनेरी सुरुवात आणि पदकांचा ऐतिहासिक चौकार! अवनीची सुवर्ण लकाकी; मोनाची कांस्य किमया

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत शुक्रवारच्या दुसऱ्या दिवशी भारताने सुवर्ण यशासह पदकांचा ऐतिहासिक चौकार लगावला.
Paralympic Games Paris 2024: सोनेरी सुरुवात आणि पदकांचा ऐतिहासिक चौकार! अवनीची सुवर्ण लकाकी; मोनाची कांस्य किमया
Published on

पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत शुक्रवारच्या दुसऱ्या दिवशी भारताने सुवर्ण यशासह पदकांचा ऐतिहासिक चौकार लगावला. भारताने पदकांचे खाते उघडतानाच दिवसभरात एकूण चार पदके जिंकली. नेमबाजीत अवनी लेखराने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकाचा वेध साधला, तर मोनानेही तिच्यासह कांस्य जिंकले. त्यानंतर नेमबाजीतच मनीष नरवालने रौप्यपदक पटकावले. ॲथलेटिक्समधील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीती पालने कांस्यपदक कमावून भारतासाठी दिवसातील चौथे पदक पक्के केले.

चॅटेरॉक्स : पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताने धडाक्यात पदकांचे खाते उघडले. नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर रायफल (एसएच १) प्रकारात भारताच्या अवनी लेखराने ऐतिहासिक सुवर्णपदक काबिज केले. तर त्याच प्रकारात मोना अगरवालने कांस्यपदक कमावून आनंद द्विगुणित केला.

चॅटेरॉक्स येथील राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या अंतिम फेरीत २२ वर्षीय अवनीने २४९.७ गुणांसह सुवर्णवेध साधला. २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्येही अवनीने सुवर्ण पटकावले होते. त्यामुळे सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सोनेरी यश संपादन करणारी अवनी ही भारताची पहिलीच क्रीडापटू ठरली. टोकियोतील २४९.६ गुणांचा विक्रमसुद्धा अवनीने यावेळी मोडीत काढून नवा विक्रम नोंदवला.

३७ वर्षीय मोनाने २२८.७ गुणांसह कांस्य जिंकले. मोनाने यापूर्वी पॉवरलिफ्टिंग, गोळाफेक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांत स्वत:चे नशीब आजमावले. अखेर नेमबाजीत स्थिरस्थावर झाल्यावर तिने आता देशासाठी पदक जिंकण्याचा पराक्रम केला. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताच्या दोन नेमबाजांनी एकाच प्रकारात पदके जिंकण्याची किमया साधली आहे. नेमबाजीतील एसएच १ प्रकारात पाय नसलेले किवा कंबरेखालील भागात अपंगत्व असलेले खेळाडू सहभागी होतात.

अवनीला ११व्या वर्षीच कार अपघातामुळे अपंगत्व आले. चार वर्षांपूर्वी अवनी भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली नेमबाज ठरली होती. तिने कामगिरीत सातत्य राखताना यंदाही सुवर्ण कामगिरी केली. प्रशिक्षक सुमा शिरूर यांचाही तिच्या यशात मोलाचा वाटा आहे. पात्रता फेरीत अवनीने ६२५.८ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला होता. अंतिम फेरीत मग तिने अधिक लक्ष केंद्रित करून सुवर्णपदक पटकावले. अवनी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारातसुद्धा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकणे स्वप्नवत आहे. माझे पालक, प्रशिक्षक आणि संपूर्ण सहाय्यक चमूमुळे हे शक्य झाले. स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव शिबिराचा मला अत्यंत लाभ झाला.

- अवनी लेखरा

> अवनी ही सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी भारताची पहिली क्रीडापटू ठरली.

> पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रथमच भारताच्या दोन नेमबाजांनी एकाच प्रकारात पदके जिंकण्याचा पराक्रम केला.

logo
marathi.freepressjournal.in