Paralympic Games Paris 2024: धरमबीरची सुवर्ण, प्रणवची रौप्य फेक

पुरुषांच्या एफ-५१ प्रकारात भारताच्या धरमबीर नैनने आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर प्रणव सूरमाने रौप्यपदक प्राप्त केले.
Paralympic Games Paris 2024: धरमबीरची सुवर्ण, प्रणवची रौप्य फेक
@pranavsoorma/X & @KirenRijiju/X
Published on

पॅरिस : ॲथलेटिक्समधील क्लब थ्रो क्रीडा प्रकारात भारताने दुहेरी पदकांवर नाव कोरले. पुरुषांच्या एफ-५१ प्रकारात भारताच्या धरमबीर नैनने आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर प्रणव सूरमाने रौप्यपदक प्राप्त केले. क्लब थ्रो क्रीडा प्रकारात भारताने प्रथमच पॅरालिम्पिक पदक जिंकले, हे विशेष.

क्लब-थ्रो प्रकारात व्हिलचेअरवर बसून खेळाडू लाकडाच्या बाटलीला दूरवर फेकतात. गोळाफेक, भालाफेकीप्रमाणेच येथेही एका खेळाडूला सहा संधी मिळतात. पाय अथवा कंबरेखालील भागात अपंगत्व असलेले खेळाडू या प्रकारात सहभागी होतात. त्यापैकी भारताच्या ३५ वर्षीय धरमबीरने पाचव्या प्रयत्नात ३४.९२ मीटर अंतरावर बाटली फेकली. यामुळे त्याचे सुवर्ण पक्के झाले. धरमबीरने यापूर्वी जागतिक स्पर्धेतही कांस्य जिंकले होते.

दुसरीकडे ३० वर्षीय प्रणवने पहिल्याच प्रयत्नात ३४.५९ मीटर अंतर सर करून रौप्यपदक पटकावले. सर्बियाच्या फिलिपने ३४.१८ मीटरसह कांस्यपदक प्राप्त केले. याच प्रकारात भारताचा अन्य स्पर्धक अमित सरोहाला मात्र २३.९६ मीटरसह तळाच्या स्थानी समाधान मानावे लागले. अमित प्रणव व धरमबीर यांचा मार्गदर्शकही आहे. त्यामुळे त्याने स्वत:च्या निराशाजनक कामगिरीनंतरही दोघांचे कौतुक केले.

logo
marathi.freepressjournal.in