पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा पॅरालिम्पिकवर केंद्रित झाल्या असून, पॅरालिम्पिक ज्योत जमिनीवरून, तसेच समुद्राखालून प्रवास करून पॅरिसमध्ये दाखल होईल आणि स्पर्धेच्या कालावधीत ती फ्रेंचच्या अवकाशात हॉट एअर बलूनमधून उडत राहील.
पॅरालिम्पिक खेळाचे जन्मस्थान असलेल्या लंडनच्या वायव्येकडून स्टोक मँडविले गावात शनिवारी ही ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ज्योतीच्या रिले प्रवासात सुरुवात होईल. चार दिवसांच्या प्रवासात ज्योत इंग्लिश खाडीच्या मार्गावर समुद्राखालून आणि नंतर भूमध्य समुद्र ते आल्प्स पर्वतरांगातून प्रवास करत पॅरिसमध्ये दाखल होईल.
या वेळी प्रथमच पॅरालिम्पिक ज्योतीचा पाण्याखालून प्रवास होत आहे. ब्रिटनच्या २४ धावपटूंचा एक गट समुद्राखालील ५० किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात करेल. त्यांच्याकडून फ्रान्सचे २४ खेळाडू ही ज्योत स्वीकारतील आणि कॅलेसच्या किनाऱ्यावर आणतील. त्यानंतर याच ज्योतीने रिले सोहळ्यासाठी प्रतीकात्मक १२ ज्योती प्रज्वलित करण्यात येतील.
रिलेसाठी वेगवेगळ्या करण्यात आलेल्या १२ ज्योतींची उद्घाटनादिवशी पुन्हा एक ज्योत करण्यात येईल. ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणे ही ज्योतही पाणी आणि विद्युत प्रकाशाच्या सहाय्याने एका हॉट बलूनद्वारे फ्रान्सच्या अवकाशात उडेल. स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी ही ज्योत सूर्यास्तापासून पहाटे २ वाजेपर्यंत आकाशात १९७ फुटांवरून उडत राहील.
४ दिवस आणि ५० शहरे
ही ज्योत फ्रान्समध्ये आल्यावर त्याच्या १२ वेगवेगळ्या ज्योती करण्यात येतील आणि स्पर्धेपूर्वी ४ दिवस १००० धावक ५० शहरांतून या ज्योतीचा प्रवास करतील. ज्योत वाहकांमध्ये प्रामुख्याने माजी पॅरालिम्पियन खेळाडू, तरुण पॅरा खेळाडू, पॅरालिम्पिक महासंघाचे स्वयंसेवक व प्रगत तांत्रिक समर्थकांचा समावेश असेल.
नीरज थेट ९३ मीटर गाठेल : झझारिया
तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला अद्याप ९० मीटरचा टप्पा गाठता आलेला नाही. मात्र तो यासाठी अथक मेहनत घेत असून या विळख्यातून जेव्हा तो बाहेर पडेल, तेव्हा थेट ९३ मीटरपर्यंत पोहचेल, असा विश्वास माजी पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झझारिया यांनी व्यक्त केला. झझारिया हे भारताच्या पॅरालिम्पिक पथकाचे प्रमुख आहेत. तसेच २०२६च्या पॅरालिम्पिकमध्ये आपण ५० पदकांचे उद्दिष्ट साध्य करून अव्वल १० देशांत स्थान मिळवू, असेही त्यांनी सांगितले.