पॅरिस : महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतल टी-३५ प्रकारात भारताच्या प्रीती पालने कांस्यपदकाला गवसणी घातली. भारताचे हे पॅरालिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्सच्या ट्रॅक प्रकारातील आजवरचे पहिलेच पदक ठरले.
उत्तर प्रदेशच्या २३ वर्षीय प्रीतीने १४.२१ सेकंद अशी वेळ नोंदवून तिसरे स्थान मिळवले. शर्यतीच्या सुरुवातीला ती काहीशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर प्रीतीने वेग वाढवला. १९८४पासून पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्सच्या फिल्ड प्रकारातच पदके जिंकली होती. प्रीतीच्या यशामुळे भारताला ट्रॅकमध्ये पदक प्राप्त झाले. मे महिन्यात प्रीतीने याच प्रकारात जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
दरम्यान, शुक्रवारी चीनच्या झोऊ चिनाने १३.५८ सेकंदांसह सुवर्ण, तर गुओ क्विडानने १३.७४ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रीतीविषयी ट्वीट करताना तिचे अभिनंदन केले. टी-३५ प्रकारात स्नायूंच्या कमकुवतपणामुळे गंभीर आजार झालेले खेळाडू सहभागी होतात.
“कारकीर्दीतील पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक पटकावू शकले, यावर अद्यापही विश्वास बसत नाही. भारतासाठी हे ट्रॅक प्रकारातील पहिलेच पॅरापदक आहे. त्यामुळे मी अधिक आनंदी आहे,” असे प्रीती म्हणाली. प्रीती टी-३५ प्रकारांत २०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही सहभागी होणार आहे.