पॅरिस : भारताच्या कपिल परमारने गुरुवारी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ज्युडोच्या ६० किलो वजनी गटातील जे-१ प्रकारात कांस्यपदक मिळवले. भारतासाठी हे ज्युडोमधील आजवरचे पहिले पॅरालिम्पिक पदक ठरले.
पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात कपिलने कांस्यपदकाच्या लढतीत ब्राझीलच्या डी ओलिव्हिराला १०-० अशी धूळ चारली. उपांत्य फेरीत कपिलला खोराम अबादीकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्याने अखेरीस पदक जिंकलेच. जे-१ प्रकारात दृष्टी अतिशय कमी असलेले खेळाडू सहभागी होतात. २०२२मध्ये कपिलने आशियाई स्पर्धेत याच प्रकारात रौप्यपदक पटकावले होते.
१०० मीटर शर्यत : सिमरन उपांत्य फेरीत
भारताची जागतिक सुवर्ण विजेती धावपटू सिमरनने महिलांच्या १०० मीटर शर्यतीच्या टी-१२ प्रकारात उपांत्य फेरी गाठली. १२.१७ सेकंदांत सिमरनने शर्यत पूर्ण केली. सिमरनने १६ जणांमध्ये दुसरे स्थान मिळवले. शुक्रवारी उपांत्य फेरी पार पडणार आहे.
नेमबाजी : अवनीचे दुसरे पदक हुकले
भारताची नेमबाज अवनी लेखराला स्पर्धेतील दुसऱ्या पदकाने हुलकावणी दिली. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अवनीला ४२०.६ गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. अवनीने सातव्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली होती. काही दिवसांपूर्वी तिने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पटकावले होते.