चॅटेरॉक्स : टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मनीष नरवालने यंदा रौप्यपदकावर निशाणा साधला. नेमबाजीतील पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल (एसएच १) प्रकारात २२ वर्षीय मनीषने रौप्यपदक प्राप्त केले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकणाऱ्या मनीषकडून यंदाही १० मीटर प्रकारातही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित होती. मात्र मनीष थोडक्यात कमी पडला. त्याने २३४.९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. दक्षिण कोरियाच्या मार्क्समनने २३७.४ गुणांसह सुवर्ण पटकावले. अंतिम फेरीतील दोन राऊंडनंतर मनीष पाचव्या स्थानी होता. मात्र त्यानंतर त्याने कामगिरी उंचावून दुसरे स्थान मिळवले. परंतु शेवटच्या दोन राऊंडमध्ये एकदाही १० पेक्षा अधिक गुण न मिळवता आल्याने मनीषला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. पात्रता फेरीत मनीषने ५६५ गुण मिळवून पाचव्या स्थानासह अंतिम फेरी गाठली होती.
याच प्रकारात भारताचा अन्य स्पर्धक रुद्रांक्ष खंडेलवालला पात्रता फेरीत ५६१ गुणांसह नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. अव्वल ६ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. पुरुषांच्या एचएस १ प्रकारात नेमबाज व्हिलचेअरवर अथवा शक्य असल्यास जागेवर उभे राहूनही नेम साधू शकतात.
आठ वर्षांपूर्वी पाण्याच्या टँकरने पाठीमागून धक्का दिल्याने मला अपंगत्व आले. मात्र मी हार मानली नाही. नेमबाजीत आधीपासूनच रस असल्याने मी या खेळाची निवड केली. सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणे अभिमानास्पद आहे.
- मनीष नरवाल