Paralympic Games Paris 2024: मोदींनी घेतली पॅरालिम्पिकपटूंची भेट

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंतची सर्वाधिक पदके मिळवून देणाऱ्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली.
Paralympic Games Paris 2024: मोदींनी घेतली पॅरालिम्पिकपटूंची भेट
PTI
Published on

नवी दिल्ली : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंतची सर्वाधिक पदके मिळवून देणाऱ्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मोदींनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या पदकांवर स्वाक्षऱ्याही केल्या.

भारताने पॅरालिम्पिकमध्ये सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण २९ पदके पटकावली. भारताची पॅरालिम्पिकमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी २०२०च्या टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती.

पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरण्याचा मान पटकावणाऱ्या अवनी लेखरा हिने एक विशेष संदेश असलेली आपली जर्सी पंतप्रधानांना भेट दिली. त्यावर ‘धन्यवाद सर, तुमच्या पाठिंब्यासाठी’ असा संदेश लिहिला होता. त्यानंतर मोदींनी कपिल परमारच्या कांस्यपदकावर स्वाक्षरी केली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने ८४ खेळाडूंचे पथक पाठवले होते. १२ क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तसेच पॅरासायकलिंग, पॅरारोईंग आणि ब्लाइंड ज्युदो या तीन नव्या प्रकारात भारताचे खेळाडू सहभागी झाले होते. भालाफेकपटू सुमित अंतिल याने पॅरालिम्पिकमध्ये ७०.५९ मीटर अशी कामगिरी नोंदवत नव्या विक्रमाची नोंद केली. त्याने एफ-६४ प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

logo
marathi.freepressjournal.in