पॅरिस : पुरुषांच्या लांब उडीतील टी-४७ प्रकारात निशाद कुमारने रौप्य झेप घेतली. त्याने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली.
२४ वर्षीय निशादने २.०४ मीटर अंतरावर झेप घेत पदक पक्के केले. हिमाचल प्रदेशच्या निशादने गेल्या पॅरालिम्पिकमध्येही रौप्यपदकच जिंकले होते. यावेळी त्याला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. अमेरिकेच्या रॉड्रिकने २.१२ मीटरच्या उडीसह सुवर्णपदक प्राप्त केले.
याच प्रकारात भारताचा अन्य स्पर्धक राम पालला मात्र १.९५ मीटर झेपसह सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. ॲथलेटिक्समधील चमकदार कामगिरीमुळे भारताचे यंदा २५ पदकांचे लक्ष्य साध्य होण्याची शक्यता बळावली आहे.
रवी, रक्षिता अपयशी
पॅरिस : ‘एफ४०’ वर्गीकरणातील गोळाफेक प्रकारात भारताच्या रवी रोंगालीने अंतिम फेरी गाठली, पण अखेरीस त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ‘टी११’ वर्गीकरणातील १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रक्षिता राजूला अंतिम फेरीचा टप्पाही गाठता आली नाही.
महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रक्षिताला पात्रता फेरीचाही अडथळा पार करता आला नाही. पात्रता फेरीतील तिसऱ्या शर्यतीत चार स्पर्धकांत रक्षिता ५ मिनिटे २९.९२ सेकंद वेळेसह अखेरच्या स्थानावर राहिली. ही शर्यत चीनच्या शानशानने ४ मिनिटे ४४.६६ सेकंदात जिंकून अंतिम फेरी गाठली.