Paralympic Games Paris 2024: शीतल-राकेश यांचा कांस्य वेध

पायाने निशाणा साधणारी शीतल देवी आणि राकेश कुमार या जोडीने तिरंदाजीतील मिश्र सांघिक कम्पाऊंड प्रकारात कांस्यपदकाचा वेध घेतला. शीतल-राकेश यांनी कांस्यपदकाच्या लढतीत इटलीच्या जोडीवर मात केली.
Paralympic Games Paris 2024: शीतल-राकेश यांचा कांस्य वेध
Published on

पॅरिस : पायाने निशाणा साधणारी शीतल देवी आणि राकेश कुमार या जोडीने तिरंदाजीतील मिश्र सांघिक कम्पाऊंड प्रकारात कांस्यपदकाचा वेध घेतला. शीतल-राकेश यांनी कांस्यपदकाच्या लढतीत इटलीच्या जोडीवर मात केली.

१७ वर्षीय शीतल आणि ३९ वर्षीय राकेश यांना उपांत्य फेरीत इराणच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना कांस्यपदकाच्या लढतीत खेळावे लागले. मात्र तेथे शीतल आणि राकेशच्या जोडीने पिछाडीवरून सरशी साधताना एलोर्ना सर्ती व मॅट बोन्सिया या इटालियन जोडीवर १५६-१५५ अशी अवघ्या एका गुणाने मात केली. त्यांच्या या यशामुळे भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात तिरंदाजीतील अवघे दुसरे पदक पटकावले. २०२०मध्ये हरविंदर सिंगने एकेरीत कांस्य जिंकले होते.

त्याशिवाय शीतल ही तिरंदाजीतील चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिलीच महिला ठरली. जन्मापासूनच हात नसलेली शीतल पायाने लक्ष्यभेद करते. गेल्या वर्षी हांगझो येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर शीतल प्रकाशझोतात आली होती. त्या स्पर्धेत शीतलने दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती आणि अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला पॅरा-खेळाडू ठरली होती. दुसरीकडे राकेशला २००९मध्ये पाठीच्या कणाची दुखापत झाल्याने तो कायमस्वरूपी व्हिलचेअरवर असतो.

logo
marathi.freepressjournal.in