Paralympic Games Paris 2024: सुमितची पुन्हा सुवर्ण भालाफेक

Sumit Antil: भारताचा भालाफेकपटू सुमित अंटिलने सोमवारी मध्यरात्री पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक दुसऱ्यांदा सुवर्ण यश संपादन केले.
Paralympic Games Paris 2024: सुमितची पुन्हा सुवर्ण भालाफेक
@sumit_javelin/X
Published on

पॅरिस : भारताचा भालाफेकपटू सुमित अंटिलने सोमवारी मध्यरात्री पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक दुसऱ्यांदा सुवर्ण यश संपादन केले. पुरुषांच्या भालाफेकीतील एफ-६४ प्रकारात सुमितने ७०.५९ मीटर अंतरासह स्पर्धा विक्रम नोंदवतानाच सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. भारतासाठी हे यंदाच्या पॅरालिम्पिकमधील तिसरे सुवर्ण ठरले.

२६ वर्षीय सुमितने २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ६८.५५ मीटर अंतरासह सुवर्णपदक मिळवले होते. यंदा उद्घाटन सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावणाऱ्या सुमितने स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यासह स्पर्धा विक्रमही केला. सुमितच्याच नावावर ७३.२९ मीटरचा विश्वविक्रमही आहे. सुमित हा सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा भारताचा एकंदर दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी महिलांमध्ये नेमबाज अवनी लेखराने हा पराक्रम नोंदवला होता. अवनीने काही दिवसांपूवी महिलांच्या १० मीटर रायफल प्रकारात सुवर्ण पटकावले. पुरुषांचा विचार करता मात्र प्रथमच एका भारतीयाने लागोपाठ दोन पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहेत. देवेंद्र झझारियाने २००४ व २०१६च्या पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीतच सुवर्ण पटकावले होते. मात्र सलग दोन स्पर्धेत अशी कामगिरी करणारा सुमित पहिलाच भारतीय पुरुष ठरला.

२०२३ व २०२४च्या जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या सुमितने गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेतही पहिला क्रमांक मिळवला होता. कुस्तीतून भालाफेकीकडे वळलेल्या सुमितने दुसऱ्या प्रयत्नात ७०.५९ मीटर अंतरावर भालाफेक करत आघाडी मिळवली. त्याने अखेरच्या प्रयत्नात ६९.११ मीटर अंतरावर भालाफेक केली. ही कामगिरीसुद्धा त्याला सुवर्णपदकासाठी पुरेशी ठरली असती. कारण श्रीलंकेच्या दुलान कोढिवूने ६७.०३ मीटर अंतरासह रौप्य, तर ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनने ६४.८९ मीटरसह कांस्यपदक प्राप्त केले. सुमितने आता ७५ मीटरचे अंतर गाठण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे.

दरम्यान, याच प्रकारात भारताचे अन्य दोन स्पर्धक संदीप आणि संजय सरगर यांना अनुक्रमे चौथ्या व सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. भालाफेकीच्या एफ-६४ प्रकारात पायाने अपंगत्व असलेले खेळाडू सहभागी होतात. २०१५मध्ये मोटारसायकल चालवताना झालेल्या अपघातात सुमितला डाव्या पायाचा गुडघ्यापासूनचा भाग गमवावा लागला. त्यापूर्वी सुमितने कुस्तीमध्ये रस दाखवला होता. मात्र अपघातानंतर तो भालाफेकीकडे वळला.

२०२१मध्ये सुमित एका स्पर्धेत भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रासह खेळला होता. तसेच स्पर्धेपूर्वी नीरजसह संवाद साधल्याने लाभ झाल्याचेही सुमितने सांगितले. याच सुमितने आता देशासाठी सलग दुसरे सुवर्ण जिंकण्याची किमया साधली आहे.

logo
marathi.freepressjournal.in