भारताचे सहावे पदक निश्चित! थुलासिमती आणि मनीषा यांची बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक

Paralympic Games Paris 2024: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ५ पदके जिंकली आहेत. यापैकी चार पदके भारताने दुसऱ्या दिवशी जिंकली, तर शनिवारी तिसऱ्या दिवशी आणखी एका पदकाची कमाई केली होती.
भारताचे सहावे पदक निश्चित! थुलासिमती आणि मनीषा यांची बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक
ANI
Published on

पॅरिस : भारताची थुलासिमती मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांनी रविवारी पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या एसयू ५ प्रकाराची उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत याच दोघी एकमेकींविरुद्ध आमनेसामने येणार असल्याने भारताचे एक पदक निश्चित झाले आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ५ पदके जिंकली आहेत. यापैकी चार पदके भारताने दुसऱ्या दिवशी जिंकली, तर शनिवारी तिसऱ्या दिवशी आणखी एका पदकाची कमाई केली होती. भारतासाठी नेमबाजीत अवनी लेखराने सुवर्ण, मनीष नरवालने रौप्य, तर मोना अगरवाल, रुबिना फ्रान्सिस यांनी कांस्यपदकाचा वेध साधला. तसेच १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीती पालने कांस्यपदक पटकावले. यंदा भारताने ८४ खेळाडूंचे पथक पॅरिसला रवाना झाले असून त्यांच्याकडून २० पेक्षा अधिक पदके अपेक्षित आहे. २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. तीच भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दरम्यान, महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत १९ वर्षीय मनीषाने जपानच्या मामिको तोयोडा २१-१३, २१-१६ असे दोन गेममध्ये पराभूत केले. तर अन्य लढतीत थुलासिमतीने पोर्तुगालच्या बेट्रीस माँटेरियोला २१-१२, २१-८ अशी धूळ चारली. एरब प्लासी या बालपणापासूनच असलेल्या आजारामुळे या दोन्ही खेळाडू एसयू ५ प्रकारांत खेळतात. या प्रकारातील खेळाडूंच्या खांद्याचे अथवा हाताचे स्नायू कमकुवत असतात.

मनदीप, पलकचे आव्हान संपुष्टात

पुरुषांच्या एसएल ३ प्रकारात मनदीप कौरला, तर महिलांच्या एसएल ४ प्रकारात पलक कोहलीला पराभव पत्करावा लागला. नायजेरियाच्या बोलाजी इनोलाने मनदीपला २१-८, २१-९ असे नेस्तनाबूत केले, तर इंडोनेशियाच्या खालिमातूसने पलकवर २१-१९, २१-१५ अशी मात केली. त्यामुळे या दोघांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

शीतल देवी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

हात नसतानाही पायाने तिरंदाजीत लक्ष्य भेदणाऱ्या भारताच्या शीतल देवीला शनिवारी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आव्हान गमवावे लागले. सरीता कुमारीलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मारियाना झुनिगाने उपउपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत शीतलचा १३८-१३७ असा एका गुणाने पराभव केला. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक मिळविणाऱ्या शीतलच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होता. मानांकन फेरीत ७०३ गुणांची कमाई करताना आपलाच ६९८ गुणांचा जागतिक विक्रम मोडीत काढताना शीतलने अपेक्षा उंचावलेल्या.

अवनी, सिद्धार्थचा नेम चुकला

चॅटेरॉक्स : भारताची सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा, सिद्धार्थ बाबू यांना नेमबाजीत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मिश्र सांघिक १० मीटर एअर रायफल प्रोन प्रकारातील एसएस १ विभागात अवनीला ११व्या, तर सिद्धार्थला २८व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याशिवाय मिश्र १० मीटर एअर रायफल प्रोनच्या एसएस २ प्रकारात श्रीहर्षा देवरेड्डीला ६३०.२ गुणांसह २६व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे नेमबाजीसाठी रविवारचा दिवस निराशाजनक ठरला. अवनीने ६३२.८, तर सिद्धार्थने ६२८.३ गुण कमावले.

भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत ५ पदके जिंकली आहेत. यातील चार पदके ही नेमबाजीतील, तर एक पदक ॲथलेटिक्समधील आहे.

logo
marathi.freepressjournal.in