पॅरिस : पुरुषांच्या थाळीफेकीतील एफ-५६ प्रकारात भारताच्या योगेश कथुनियाने रौप्यपदक कमावले. त्याचे हे सलग दुसरे पॅरालिम्पिक पदक ठरले.
२७ वर्षीय योगेशने ४२.२२ मीटर अंतरावर थाळीफेक केली. त्याची ही हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पहिल्याच प्रयत्नात योगेशने इतके थाळीफेक करून आघाडी मिळवली. ब्राझीलच्या बटिस्टाने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकताना ४६.८६ मीटर अंतरावर थाळीफेक केली. एफ-५६ प्रकारात स्नायू कमकुवत तसेच पायाच्या भागात अपंगत्व असलेले खेळाडू सहभागी होतात.
“गेल्या काही स्पर्धांपासून मी सातत्याने रौप्यपदकच जिंकत आहे. त्यामुळे आता पदकाचा रंग सोनेरी करण्यासाठी मी अथक परिश्रम घेईन. देशासाठी सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद आहे,” असे योगेश म्हणाला. योगेशने २०२३ व २०२४च्या जागतिक स्पर्धेतसुद्धा या प्रकारात रौप्यपदकच पटकावले होते.