Paris Olympics 2024: गतवैभव पुन्हा मिळवण्याचे ध्येय! भारतासमोर सलामीला न्यूझीलंडचे आव्हान

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय पुरुष हॉकी संघ शनिवारी आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पॅरिस : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय पुरुष हॉकी संघ शनिवारी आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. ब-गटात समावेश असलेल्या भारतीय संघासमोर पहिल्याच लढतीत झुंजार वृत्तीच्या न्यूझीलंडचे आव्हान असेल. ऑलिम्पिकमधील सुवर्णाध्याय पुन्हा लिहिण्याच्या हेतूने यंदा भारतीय हॉकी संघ मैदानात उतरेल.

भारताने ऑलिम्पिकच्या आजवरच्या इतिहासात फक्त १० सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यांपैकी ८ सुवर्ण ही भारताच्या पुरुष हॉकी संघानेच जिंकली आहेत. मात्र त्यानंतर ४१ वर्षे भारतीय हॉकीला पदकाची प्रतीक्षा करावी लागली. २०२०मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकताना हा पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. यंदा मात्र पदकाचा रंग बदलण्याचे क्रेग फुल्टन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे लक्ष्य असेल. भारताने २०२३च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिकची थेट पात्रता मिळवली.

भारत, न्यूझीलंड यांच्याव्यतिरिक्त ब-गटात गतवेळचे सुवर्णपदक विजेते बेल्जियम, राष्ट्रकुल विजेते ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, आयर्लंड या संघांचा समावेश आहे. अ-गटात नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स हे सहा संघ आहेत. प्रत्येक गटातून आघाडीचे ४ संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

भारताचा अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या कारकीर्दीतील ही अखेरची स्पर्धा आहे. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत श्रीजेशने जर्मनीविरुद्ध निर्णायक कामगिरी केली होती. त्यामुळे हरमनप्रीतचे शिलेदार श्रीजेशला सुवर्णपदकासह निरोप देण्यास आतुर असतील. गेल्या ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या संघातील ११ खेळाडू यंदाही संघाचा भाग आहेत, तर जर्मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, अभिषेक, राजकुमार पाल, संजय हे पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत.

भारताचे सामने

२७ जुलै वि. न्यूझीलंड

२९ जुलै वि. अर्जेंटिना

३० जुलै वि. आयर्लंड

१ ऑगस्ट वि. बेल्जियम

२ ऑगस्ट वि. ऑस्ट्रेलिया

logo
marathi.freepressjournal.in