Paris 2024 Olympics: चक दे इंडिया! शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय; ग्रेट ब्रिटनवर मात करत भारत उपांत्य फेरीत

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरल्याची प्रचिती रविवारी आली. पीआर श्रीजेश या ‘ग्रेट वॉल’ समजल्या जाणाऱ्या गोलरक्षकाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनचा शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव करत पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
Paris 2024 Olympics: चक दे इंडिया! शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय; ग्रेट ब्रिटनवर मात करत भारत उपांत्य फेरीत
Twitter
Published on

पॅरिस : भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरल्याची प्रचिती रविवारी आली. पीआर श्रीजेश या ‘ग्रेट वॉल’ समजल्या जाणाऱ्या गोलरक्षकाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनचा शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव करत पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. विशेष म्हणजे अमित रोहिदासला पंचांनी लाल कार्ड दाखवल्यानंतर १० जणांसह खेळणाऱ्या टीम इंडियाने ग्रेट ब्रिटनला कडवी टक्कर देत विजयश्री संपादन केला.

ग्रेट ब्रिटनने ‘मॅन टू मॅन’ मार्किंग करत भारताला आक्रमण करण्याची कोणतीही संधी दिली नाही. ग्रेट ब्रिटनने संपूर्ण खेळावर वर्चस्व गाजवले असले तरी तीन सत्रात १० जणांसह खेळणाऱ्या भारताने त्यांना रोखून धरले. त्यात श्रीजेशने तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात त्यांना एकही गोल करण्याची संधी दिली नाही.

भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने २२व्या मिनिटाला गोल केल्यानंतर ग्रेट ब्रिटनने २७व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यांच्या ली मॉर्टन याने बरोबरी साधणारा गोल केला. त्यानंतर निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. ग्रेट ब्रिटनकडून जेम्स पीटल अल्बेरी आणि झॅचरी वॉलेस यांनी पहिले दोन गोल केले. मात्र कॉनर विल्यम्सन आणि फिलीप रॉपर यांचे गोल श्रीजेशने अडवल्यामुळे त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून हरमनप्रीत, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि राज कुमार पाल या चौघांनीही गोल केले.

“एक खेळाडू कमी असल्यामुळे आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना अखेरपर्यंत बरोबरीत रोखण्याचे आम्ही ठरवले होते. त्यामुळेच आम्ही बचावावर अधिक भर दिला. खेळाडूंमधील समन्वय आणि सांघिक कामगिरी या जोरावर आम्ही विजय मिळवू शकलो. लाल कार्ड विसरून आम्ही आमच्या रणनीतीत कोणताही बदल केला नाही. १० जणांसह खेळताना बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण रोखणे अवघड होते. आता पुढच्या सामन्यांमध्येही आम्ही असाच खेळ करण्याचा प्रयत्न करू,” असे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सांगितले.

हरमनप्रीतने गोलरक्षक श्रीजेशच्या कामगिरीची भरभरून स्तुती केली. तो म्हणाला, “भारताच्या विजयात श्रीजेशचा मोलाचा वाटा आहे. श्रीजेश हा महान खेळाडू असून भारताच्या सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक आहे. त्याने फक्त आमचा पराभवच टाळला नाही तर भारताला सुवर्णपदकाच्या दिशेने नेले आहे.

भारताला २२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्या संधीचे सोन्यात रूपांतर करत हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र भारताला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. मॉर्टनने मैदानी गोल करत सामन्यात बरोबरी साधली. अमित रोहिदासला लाल कार्ड दाखवून पंचांनी मैदानाबाहेर धाडल्यानंतर ग्रेट ब्रिटनने आक्रमणाची धार आणखीन वाढवली. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात वारंवार हल्ले करूनही ग्रेट ब्रिटनला विजयी गोल लगावता आला नाही. श्रीजेशने ग्रेट ब्रिटनने गोल करण्याचे मनसुबे अनेक वेळा उधळून लावले.

टोक्योनंतर भारतीय हॉकीची गगनभरारी! माजी कर्णधार अजित पाल सिंग यांच्याकडून स्तुती

नवी दिल्ली : सांघिक खेळ, संघर्ष करण्याची वृत्ती तसेच दमदार खेळ करत भारतीय संघाने सर्वांची मने जिंकली. एक खेळाडू कमी असतानाही प्रत्येक खेळाडू एकमेकांचा धीर उंचावत होता. टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने खऱ्या अर्थाने गगनभरारी घेतली आहे, अशा शब्दांत १९७५ साली विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार अजित पाल सिंग यांनी स्तुती केली आहे.

“भारतीय खेळाडूंनी जागतिक दर्जाचा बचाव केला. श्रीजेशचा खेळ एका वेगळ्याच उंचीवर होता. साखळी सामन्यानंतर त्याचा खेळ आणखीनच बहरला आहे. आता भारतीय हॉकी संघाकडून देशाला आणखीन एका पदकाची अपेक्षा आहे. श्रीजेशच्या कामगिरीने मी आश्चर्यचकित झालो नाही. ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या श्रीजेशने कठीण परिस्थितीत तारणहाराची भूमिका बजावली आहे. श्रीजेश शेवटची स्पर्धा खेळत असल्यामुळे त्याने आपली भूमिका चोखपणे निभावली आहे,” असेही त्यांनी सांगितले.

माजी कर्णधार सरदार सिंग यानेही भारताच्या लढाऊ वृत्तीचे आणि सांघिक खेळाचे कौतुक केले आहे. “आधुनिक हॉकीत १० खेळाडूंसह खेळणे तसेच ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीचे दडपण असतानाही कामगिरी उंचावणे खरोखरच कौतुकास्पद आहे. पण भारतीय हॉकीपटूंनी रविवारी दर्जेदार खेळाची अनुभूती दिली. श्रीजेश, मनप्रीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी संघाला बांधून ठेवले आहे. युवा खेळाडूंकडूनही ते चांगली कामगिरी करवून घेत आहेत. आता भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा सर्वांना आहे,” असे सरदार सिंगने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in