Paris Olympic 2024: नीरज पूर्णपणे तंदुरुस्त; तयारी अखेरच्या टप्प्यात! प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएट्झ यांची माहिती

Neeraj Chopra: भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा मांडीच्या अंतर्गत स्नायूच्या दुखापतीतून आता बरा झाला असून, तो तयारीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे नीरजचे वैयक्तिक प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएट्झ यांनी सांगितले.
Paris Olympic 2024: नीरज पूर्णपणे तंदुरुस्त; तयारी अखेरच्या टप्प्यात! प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएट्झ यांची माहिती
Published on

Paris Olympic Games: नवी दिल्ली : भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा मांडीच्या अंतर्गत स्नायूच्या दुखापतीतून आता बरा झाला असून, तो तयारीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे नीरजचे वैयक्तिक प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिएट्झ यांनी सांगितले. टोकियो पाठोपाठ पॅरिसमध्येही नीरजकडे पदकाच्या अपेक्षेने बघितले जात आहे. यंदाच्या हंगामात नीरजच्या तंदुरुस्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले असले, तरी आता सर्व गोष्टी रुळावर आल्या आहेत, असे बार्टोनिएट्झ म्हणाले.

नीरजची तयारी आता अखेरच्या टप्प्यात आहे. तंदुरुस्ती देखिल समाधानकारक आहे. त्याच्या मांडीच्या स्नायूच्या दुखापतीची चिंता होती. पण, ती आता दूर झाली आहे. ऑलिम्पिकपर्यंत ती अशीच राहिल अशी आशा देखिल बार्टोनिट्झ यांनी व्यक्त केली. नीरज सध्या ऑलिम्पिकसाठी तुर्कीच्या अंताल्या येथे सराव करत आहे.

“ऑलिम्पिक स्पर्धा आता एका आठवड्यावर आली असून, तो सरावाच्या अखेरच्या टप्प्यावर आहे. सध्या तो फेकीचा सराव करत आहेत. नीरजने या वेळी स्पर्धेतील सहभागापेक्षा प्रशिक्षणावर अधिक भर दिला आहे. यासाठी तो पायांमधील ताकद वाढवण्यावर भर देत आहे. भालाफेकीसाठी वेगवान धावपट्टी आणि पायामधील ताकद भक्कम असणे आवश्यक असते. या दोन्ही गोष्टींमुळे अधिक उर्जा निर्माण होते आणि फेक चांगली होते,” असे बार्टोनिएट्झ यांनी सांगितले.

मात्र बार्टोनिएट्झ यांनी या वेळी पदकाची खात्री बाळगणे सध्या तरी उचित ठरणार नाही. “पदकाबाबत अंदाज व्यक्त करणे किंवा खात्री बाळगणे हे उचित नाही. प्रत्येक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम तयारी करूनच सहभागी झालेला असतो. स्पर्धेच्या दिवशी कशी फेक होते त्यावर सगळे काही अवलंबून असते. पदकासाठी ८९ ते ९० मीटरची फेक खात्रीशीर आहे. पण, कधी-कधी ती त्यापेक्षा कमीही असू शकते. हे सर्व त्या वेळच्या परिस्थिती, वातावरण आणि खेळाडू दडपणाचा सामना कसा करता यावर अवलंबून असते,” असे त्यांनी सांगितले. भारताचे एकूण १७७ खेळाडू यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतील.

logo
marathi.freepressjournal.in